
मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेने मोक्याचा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. महापालिकेला यातून तब्बल २,१०० कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी लवकरच टेंडर काढले जाणार आहे.
जकात कर बंद झाल्यापासून मुंबई महापालिकेला अतिरिक्त महसूल प्राप्त करण्यासाठी मालमत्ता कर तसेच अन्य बाबींवर अवलंबून राहावे लागत आहे. मुंबई महापालिकेचे मोकळे भूखंड लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने तीन भूखंडांची निवडही केली आहे. मुंबई महापालिकेच्या ए विभागातील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची जागा, मलबार हिल येथील बेस्ट उपक्रमाचे बेस्ट रिसिव्हिंग स्टेशनची जागा आणि वरळीतील अस्फाल्टची काही जागा भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज मंडई पाडण्यात आली आहे. यातील मच्छिमार गाळेधारकांना क्रॉफर्ड मार्केटमधील जागेमध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र मच्छिमारांनी याला विरोध केला होता आणि हे प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे गेले होते. त्यामुळे मंडईची जागा भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती होती. मात्र तोडगा निघाल्याने मुख्यमंत्र्यांकडून महापालिकेला मंडईची जागा भाडेतत्त्वावर देण्यास परवानगी प्राप्त झाली आहे. ही जागा ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिली जाणार आहे. त्यामुळे मंडईची जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी लवकरच टेंडर काढण्यात येणार आहे.