
मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या महत्त्वकांक्षी कोस्टल रोडच्या भेगांचा व्हीडीओ सध्या मोठ्या चर्चेत आहे. त्यामुळे रस्त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक कामाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यावरून महापालिका प्रशासन सध्या पंतप्रधान कार्यालय आणि राज्य सरकारच्या रडारवर आले आहे.
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) हा प्रकल्प शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च तब्बल १४ हजार कोटींवर पोहोचला आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळी असा 10.58 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. या मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण २६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. दरम्यान, हाजी अली आणि वरळी दरम्यानच्या कोस्टल रोडवरील भेगा बीएमसीने डांबराने भरल्याचे निदर्शनास आले आहे. कोस्टल रोडवरील या पॅचचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, पंतप्रधान कार्यालयाने राज्याच्या मुख्य सचिवांकडून याबाबतची माहिती मागवली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनेही या संदर्भात महापालिकेला विचारणा केली आहे. महापालिकेला या भेगांबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. हाजी अली पुलाच्या उत्तरेकडील रस्त्याचे डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले होते तथापि, पुढील काही दिवसांत सांध्यांवर काही भेगा पडल्या, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
पावसाळ्यात भेगा पडू नयेत म्हणून मॅस्टिक डांबराचा वापर करून तात्पुरती दुरूस्ती करण्यात आली. अतिरिक्त डांबरीकरणामुळे, रस्ता अनेक ठिकाणी असमान झाला ज्यामुळे वाहनचालकांना त्रास झाला. या पॅचेसना आवश्यकतेनुसार लेवल केले जाईल आणि आवश्यकतेनुसार नवीन डांबराचा थर लावला जाईल. कायमस्वरूपी आणि शाश्वत उपाय सुनिश्चित करण्यासाठी नियोजन सुरू आहे, असेही महापालिकेने सांगितल्याचे समजते. कोस्टल रोडच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर याआधीही प्रश्न उपस्थित करण्यात झाले आहेत. सप्टेंबर 2024 मध्येही कोस्टल रोडला तडे गेल्याचे पुढे आले होते. मार्च 2024 मध्ये कोस्टल रोडचा एक टप्पा सुरू करण्यात आला. पण अडीच महिन्यातच टनेलमध्ये समुद्राचे पाणी येत असल्याचे समोर आले. त्यानंतर हे लिकेज रोखण्यासाठी विशेष अशा इपोक्सी केमिकलचा वापर करण्यात आला. आता पुन्हा एकदा कोस्टल रोडला तडे गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.