Mumbai : BMC आयुक्त भूषण गगराणी मिशन मोडवर; मुंबई सेंट्रल पार्कच्या कामाबाबत काय घेतला निर्णय?

Bhushan Gagrani
Bhushan GagraniTendernama

मुंबई (Mumbai) : कोस्टल रोड प्रकल्पात १७० एकर जमिनीवर उद्यान आणि रेसकोर्सच्या १२० एकर जमिनीवर मुंबई सेंट्रल पार्क साकारण्यात येत आहे. एकूण ३०० एकर जमिनीवर थीम पार्क होणार असून त्यात पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे पादचाऱ्यांना रेसकोर्सच्या जमिनीवरील मुंबई सेंट्रल पार्क ते कोस्टल रोड प्रकल्पातील उद्यानात आनंद लुटता येणार आहे. नवनियुक्त महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी आयुक्तपदाची धुरा सांभाळताच दोन्ही कामांचा आढावा घेत मुंबई सेंट्रल पार्कच्या कामाला वेग देण्याचे निर्देश दिले.

Bhushan Gagrani
Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; 110 वर्षे जुना 'तो' पूल होणार जमीनदोस्त; मुहूर्तही ठरला

डॉ. भूषण गगराणी यांनी महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रकल्पाची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. भूषण गगराणी यांनी कोस्टल रोड आणि रेसकोर्सच्या कामाची पाहणी केली. महालक्ष्मी रेसकोर्सची एकूण २११ एकर जागा मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना भाडेपट्ट्यावर दिलेली होती. त्याची मुदत संपल्यानंतर या २११ एकर जागेपैकी १२० एकर जागा शासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली, तर उर्वरित ९१ एकर जागा मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे.

महालक्ष्मी रेसकोर्सचे प्रवेशद्वार, गवती धावपट्टी (ग्रास ट्रॅक), वाळूची धावपट्टी (सँड ट्रॅक), घोड्यांच्या तबेल्यांचे ठिकाण, पोलो मैदान तसेच प्रेक्षकगृह (गॅलरी) आदी सर्व ठिकाणी भेटी देऊन सध्या सु‌रू असलेला वापर आणि नियोजित आराखड्यानुसार केली जाणारी कार्यवाही यांची सविस्तर माहिती त्यांनी घेतली.

रेसकोर्सवरील सार्वजनिक उद्यान आणि पलीकडील मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील उद्यान यांना जोडण्यासाठी भुयारी मार्ग, नागरिकांच्या तसेच वाहनांच्या येण्या-जाण्याची व्यवस्था, पार्कच्या निर्मितीनंतर रेसकोर्स व सार्वजनिक उद्यान यांची सुरळीत देखभाल या दृष्टीने आवश्यक बारीकसारीक सर्व तपशिलांची माहिती उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड यांनी यावेळी दिली.

Bhushan Gagrani
Nashik : ड्रायपोर्टच्या रस्त्यासाठी भूसंपादनाचे दर जाहीर; हेक्टरी 70 लाख ते 1 कोटी रुपये देणार

विहार क्षेत्र (प्रॉमिनाड), सागरी संरक्षण भिंत, सायकल ट्रॅक, पादचारी भुयारी मार्ग, हाजी अली आंतरमार्गिका तसेच उत्तरवाहिनी मार्गिकेचे काम इत्यादी ठिकाणच्या कामांची, प्रगतीची माहिती गगराणी यांनी घेतली. त्यानंतर मरीन ड्राईव्हच्या दिशेने दक्षिणवाहिनी भुयारी मार्गातून प्रवास करताना भुयारी मार्गातील आपत्कालीन स्थितीसाठी केलेल्या उपाययोजना, अग्निशमन सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेरा या सर्वांची पाहणी केली.

एवढेच नव्हे आपत्कालीन संपर्क यंत्रणेद्वारे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून यंत्रणा तत्परतेने कार्यरत असल्याची खातरजमा देखील त्यांनी केली. दोन्ही जुळ्या बोगद्यांना जोडणारे छेद बोगदे, त्याचप्रमाणे उत्तर दिशेच्या वाहतुकीसाठी बांधण्यात आलेल्या भुयारी बोगद्याची त्यांनी पाहणी केली. प्रकल्पाची कामे वेळापत्रकाप्रमाणे पूर्णत्वास जातील, यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना तसेच प्रकल्प सल्लागारांना दिल्या.

वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडण्यासाठी १२० मीटर लांब अडीच हजार टनाचा गर्डर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाँच करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधान्याने कामे सुरू आहेत, असे कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता गिरीश निकम यांनी नमूद केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, सहाय्यक आयुक्त (मालमत्ता) विनायक विसपुते, सहाय्यक आयुक्त (जी दक्षिण) संतोष धोंडे, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम आणि संबंधित अधिकारी तसेच मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडचे सचिव निरंजन सिंग आदी उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com