Hinjawadi IT पार्कची जलकोंडी फोडण्यात प्रशासन अपयशी?
पिंपरी (Pimpri) : विविध प्रशासकीय यंत्रणांच्या उदानसीनतेमुळे गेल्या वीस दिवसांमध्ये तीन वेळा हिंजवडीत जलकोंडी पहायला मिळाली. हिंजवडीतील रस्त्यांवर साचणारे पाणी, खराब रस्ते व त्यामुळे आयटीयन्स नागरिकांची होणारी गैरसोय यावर गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच स्तरांवरून टीका झाली. त्यानंतर पीएमआरडीए, एमआयडीसी यांच्यासह विविध प्रशासकीय यंत्रणांनी सोमवारी पुन्हा एकदा बैठक घेतली. मात्र, केवळ बैठका व आश्वासन नकोत तर ठोस उपाययोजना करा, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. (Hinjawadi IT Park Rain News)
पावसाळ्यात साचणारे पाणी व होणारी वाहतूक कोंडी हे चित्र हिंजवडीत गेल्या अनेक वर्षांपासून दिसत आहे. मात्र, टीका झाल्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. यावेळीही टीका झाल्यानंतर ३० तारखेपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन विविध प्रशासकीय यंत्रणांनी दिले आहे. मात्र, त्यासाठी सध्या ज्या युद्ध पातळीवर काम होणे अपेक्षित आहेत. ते होताना दिसत नाही.
कोणाकडे काय जबाबदारी
पीएमआरडीए
- नैसर्गिक प्रवाहांवर अतिक्रमण करणाऱ्या इमारतींना नोटीस बजावणे
- हिंजवडीतील प्रस्तावित रस्त्यांच्या कामांच्या जमीन अधिग्रहणासाठी ग्रामस्थांची बैठक घेणे
- प्रलंबित प्रकल्पांसाठी जागा मालकांची बैठक घेणे
- बुजविण्यात आलेले नैसर्गिक प्रवाह शोधणे
- अवैध बांधकाम काढल्यानंतर राडारोड्याची विल्हेवाट लावणे
एमआयडीसी
-नाले, भुयारी गटारे यांची देखभाल व दुरुस्ती करणे
- नैसर्गिक प्रवाहांवर अतिक्रमण करणाऱ्या खासगी कंपन्यांना नोटीस बजावणे
- पावसाचे पाणी रस्त्यांवर सोडणाऱ्या कंपन्यांना नोटीस बजावणे
- रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे
- पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे
- कोणतेही बांधकाम पूर्ण झाल्यावर तेथील नाल्यांची स्थिती पाहून अहवाल देणे
हिंजवडी व माण ग्रामपंचायत
- हिंजवडीतील कचऱ्याची विल्हेवाट लावणे
- कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करणे
पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड
- मेट्रो मार्गातील केबल जोडणीचे काम करून रस्ता पूर्ववत करणे
- मेट्रो मार्गातील रस्त्यांची दुरुस्ती करणे, खड्डे तत्काळ भरणे
- मेट्रो मार्गिकेलगतच्या रस्त्याच्या सफाईचे काम करणे
-मेट्रो स्थानकाच्या प्रवेशांचे काम पूर्ण करणे
- माहिती फलक, आपत्कालीन सिग्नल,रिफ्लेक्टर उभारणे
-पादचारी मार्गांची दुरुस्ती करणे
‘‘हिंजवडी फेज १, २ आणि ३ तसेच मेट्रो मार्गासह परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा, रस्ते दुरुस्ती आणि नागरी सुविधांबाबत सोमवारी पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांच्यासह पाहणी केली आहे. भविष्यातही नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी समन्वयाने आमचे काम सुरू आहे. तीस तारखेपर्यंत आम्ही दिलेला ॲक्शन प्लॅन पूर्ण करणार आहोत.’
- नितीन वानखेडे, वरिष्ठ अभियंता, एमआयडीसी
‘‘हिंजवडीमध्ये अनेक प्रशासकीय यंत्रणा काम करतात. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती आल्यावर जबाबदारी कोणच घेत नाही. मागे झालेल्या बैठकीमध्ये सर्व विभागाचे अधिकारी होते. मात्र, त्यांचे काम स्थानिक पातळीवर जसे व्हायला पाहिजे तसे दिसत नाही.
- पवनजीत माने, अध्यक्ष, एफआयटीई