‘त्या’ तीन प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार

Palghar
PalgharTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : पालघर (Palghar) जिल्ह्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर रचना व मूल्यनिर्धारण संचालनालय, नॅशनल हायस्पिड रेल कार्पोरेशन व मुंबई रेल्वे विकास महामंडळ आदी विविध यंत्रणांकडून राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा वन मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी आढावा घेतला. पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी हे सर्व प्रकल्प महत्त्वाचे असून या प्रकल्पांच्या कामांना गती देण्यात यावी. यासाठी वन विभाग व जिल्हा प्रशासनाकडून सर्व सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Palghar
Eknath Shinde : ठाणे बोरिवली मार्गावरील बोगद्याबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; काय दिले आदेश?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पालघर जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी आग्रही भूमिका मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर वन मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री नाईक यांनी सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक घेतली. यावेळी विविध यंत्रणांनी पालघर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, बाह्यरस्ते विकास योजना, पालघर जिल्ह्यातील विकासकामे, सफाळे/केळवा/माहिम विकास केंद्रे, पालघर विक्रमगड मार्गे समृद्धी महामार्गाला जोडणारा रस्ता, विरार अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, एमयूटीपी ३ अंतर्गत करण्यात येणारे रेल्वेची कामे आदींचा समावेश होता.

Palghar
Mumbai : विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉर बीओटीवर राबविणार; मंत्रिमंडळाची मोहोर

वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग व बुलेट ट्रेन अशा प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे. याबरोबरच इतरही प्रकल्प जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या प्रकल्पांना वन मंत्री म्हणून तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक तथा वन बल प्रमुख शोमिता बिश्वास, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव, श्री. रामाराव, मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल, पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वसई विरार महापालिका आयुक्त अनिल पवार, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झिरमुरे, उपसचिव विवेक होशिंग आदी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com