Good News: 'समृद्धी'चा 85 किमीचा शिर्डी ते इगतपुरी टप्पा पूर्ण

Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg
Mumbai - Nagpur Samruddhi MahamargTendernama

नाशिक (Nashik) : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील (Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg) शिर्डी ते इगतपुरी या ८५ किलोमीटरच्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, हा मार्ग सरकारच्या मान्यतेनंतर लवकरच वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो. या टप्प्यावरील वाहतूक सुरू झाल्यानंतर मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत किमान दीड ते दोन तासांची बचत होणार आहे.

Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg
Nashik: खूशखबर! 'या' कंपनीची गोवा, नागपूर, अहमदाबाद विमानसेवा सुरू

राज्य सरकारने २०१६ मध्ये नागपूर ते मुंबई हा आठ लेनचा समृद्धी महामार्ग प्रस्तावित केला. त्या महामार्गाचे काम २०१९ मध्ये सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०२२ मध्ये नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे उद्घाटन झाले. नागपूर ते शिर्डी या टप्प्यात महामार्गाला चांगला प्रतिसाद मिळत असून, नागपूर ते शिर्डी अंतर केवळ पाच ते सहा तासांवर आले आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवासास नागरिक प्राधान्य देत आहेत. या महामार्गामुळे नाशिकहून छत्रपती संभाजीनगरसह विदर्भ, मराठवाड्यातील शहरांपर्यंत जाणे अधिक सुलभ होणार आहे. सध्या हा महामार्ग कोपरगाव तालुक्यातील कोकमठाणपर्यंत खुला असल्यामुळे नाशिकच्या वाहनांना कोपरगाव अथवा वैजापूरपर्यंत इतर मार्गाने जावे लागत आहे.

Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg
MSRTC: एसटीचा क्रांतिकारी निर्णय; 5 हजार ई-बसेससाठी निघाले टेंडर

सिन्नर तालुक्यातील पाथरे ते कोकमठाण या ११ किलोमीटर अंतरावरील रखडलेले काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. तसेच टप्पा क्रमांक बारामधील सोनांबे (ता. सिन्नर) ते भरवीर (ता. इगतपुरी) हे २५ किलोमीटरचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे कोकमठाण ते भरवीर हे ८५ किलोमीटरचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या वाहनांना आता नाशिकला येण्याची गरज नाही. घोटी-सिन्नर मार्गावरून भरवीर येथे समृद्धी महामार्गावर जाता येईल. तेथून अगदी तासाभरात कोकमठाण येथून शिर्डीला जाणे सहज शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकच्या प्रवाशांनाही समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यासाठी कोकमठाण अथवा वैजापूरपर्यंत जाण्याची गरज पडणार नाही. त्यांना इगतपुरी तालुक्यातील भरवीर किंवा सिन्नर तालुक्यातील गोंदे या दोन ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करणे सोईचे ठरणार आहे.

Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg
Mumbai : बापरे! 252 कोटींचा फ्लॅट अन् 15 कोटींची स्टॅम्प ड्युटी

हा ८५ किलोमीटरचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर नाशिक-पुणे महामार्ग व मुंबई-आग्रा महामार्गाशी समृद्धी महामार्ग जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई ते नागपूर प्रवासाचा वेळ आणखी कमी होऊ शकणार आहे. भरवीर ते मुंबई या शंभर ते सव्वाशे किलोमीटर अंतरात डोंगररांगांचे प्रमाण अधिक असून, तेथे महाकाय बोगद्यांचे काम सुरू आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. यामुळे तोपर्यंत शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com