Eknath Shinde: ठाण्यात एलिव्हेटेड अन् भुयारी रस्त्यांच्या जाळ्यामुळे वाहतुकीचा वेग वाढणार

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai): मुंबईतून फ्रीवेवरून उतरल्यानंतर आनंदनगर–साकेते–गायमुख–फाउंटन हॉटेल असा एलिव्हेटेड रस्ता उभारण्यात येत आहे. तसेच टिकुजी-नी-वाडी ते बोरिवली असा भुयारी मार्ग बांधला जात असून, या मार्गामुळे भविष्यात केवळ दहा ते पंधरा मिनिटांत हे अंतर पार करता येईल.

सध्या मीरा-भाईंदर ते बोरिवली यासाठी दोन ते अडीच तास लागतात. या दोन्ही प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि ठाण्याचा विकास अधिक गती घेईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde
धरणाकाठच्या जागांबाबत सरकारने काय घेतला निर्णय? आता 49 वर्षांच्या कराराने...

राजमाता जिजाऊ उद्यान ‘ऑक्सीजन पार्क’चे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. त्यानंतर ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील जय भवानी नगर येथे नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या स्वर्गीय आनंद दिघे उद्यानाचे लोकार्पण देखील करण्यात आले.

कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, आयुक्त सौरभ राव, उद्यान विकसित करणारे आनंद पाटील, केदार पाटील, विजय पाटील, वागळे इस्टेटचे विभागप्रमुख माजी नगरसेवक एकनाथ भोईर, यज्ञेश भोईर यांच्यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Eknath Shinde
मुंबईतील कामाठीपुऱ्याबाबत आली चांगली बातमी! लवकरच...

शिंदे म्हणाले, “ठाण्याचा झपाट्याने विकास होत आहे. चांगले अधिकारी मिळाले तर जिल्ह्याचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही. मोठ्या शहरांत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आवश्यक आहे. मी आयुक्तांना एक लाख झाडे लावण्याची सूचना केली होती, त्यांनी तब्बल एक लाख पंचवीस हजार झाडे लावली. यावर्षी दोन लाख झाडे लावण्याचे सूचविले असता त्यांनी दोन लाख नऊ हजार झाडे लावली आहेत.”

मुंब्राच्या टेकडीवरील झाडांची वाढ आणि त्यांचा ‘वाढदिवस’ साजरा करणाऱ्या नागरिकांचा उल्लेख करताना त्यांनी पर्यावरणप्रेमी समाजाचे कौतुक केले. “विदर्भ, मराठवाड्यातील पूरस्थिती हे हवामान बदलाचे द्योतक आहे. त्या भागातील शेतकऱ्यांना मदतीसाठी ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून, आतापर्यंत साडेतीन ते चार हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. पुरात पशुधनाची हानी झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०१ दूध देणाऱ्या गायी देण्याचा निर्णयही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे,” असे सांगितले.

ऑक्सीजन पार्काबाबत शिंदे म्हणाले, “येथे औषधी वनस्पती, भरपूर ऑक्सिजन आणि गारवा आहे. फिरण्यासाठी ५०० मीटरचा ट्रॅक तयार केला आहे. येथे फिरल्याने बरेच आजार दूर होतील. पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केली आहे.

Eknath Shinde
Maharashtra Government: ग्रामीण महाराष्ट्रासाठी सरकारने काय दिली गुड न्यूज?

“बांबू उद्योगाला सरकारने उद्योगाचा दर्जा दिला आहे. राज्यभरात बांबू लागवडीसाठी सबसिडी दिली जाते. बंगळुरू विमानतळाप्रमाणे रत्नागिरी विमानतळाच्या बांधकामातही बांबूचा वापर केला जाणार आहे,” असे शिंदे म्हणाले. “साताऱ्यात गटशेतीद्वारे बांबू लागवड आणि प्रोसेसिंग सुरू करता येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

पर्यावरण रक्षणासाठी गायमुख, लोकमान्य नगर या सह अन्य ठिकाणी ‘अर्बन फॉरेस्ट’ची निर्मिती करण्यात आली आहे. वनविभागाच्या जमिनीवर पन्नास हजार बांबू लावण्यात आले आहेत. “ठाण्यातील तलाव पुनर्जीवित करण्याचे कामही सुरू आहे. जोगीला मार्केट शेजारील तलाव पुनर्जीवित करून जगातील पहिलं उदाहरण ठरलं. मासुंदा तलावाचे डीसिल्टिंग, नक्षत्र उद्यानासाठी चार कोटी निधी अशी अनेक कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

“प्रत्येक विद्यार्थ्याने दोन झाडे लावून ती जगवावीत,” अशी सूचना त्यांनी आयुक्तांना केली. “सध्याचे ठाणे हे बदलते ठाणे आहे — रस्ते रुंदावले जात आहेत, मेट्रोचे जाळे वाढत आहे. डिसेंबरमध्ये मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होईल, तर पुढील टप्प्यात ती मीरा-भाईंदर व वडाळ्यापर्यंत जाईल. ठाण्यात रिंग मेट्रोही होणार आहे. विकसित, बदलते आणि हरित ठाणे घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे,” असे शिंदे म्हणाले.

घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीबाबत त्यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या. “पावसाळा संपल्यामुळे रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत; ती लवकर पूर्ण करून नागरिकांची कोंडीतून सुटका करा,” असे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com