
मुंबई (Mumbai): मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजनेतंर्गत घरकुलाचे काम व्यापक प्रमाणात सुरु असून त्याअंतर्गत 72 हजार 97 घरकुलं पूर्ण झाले असल्याचे सांगून भूमिहीन लाभार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन त्यांना प्राधान्याने घरकुलाचा लाभ द्यावा, तसेच पुढील उद्दीष्टेही गतीने पूर्ण करावे, असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
ग्रामीण गृहनिर्माणाच्या कामांबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री गोरे यांनी संबंधितांना निर्दैशित केले. बैठकीस ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामीण गृहनिर्माण संचालक, डॉ. राजाराम दिघे तसेच ग्रामविकास विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत योजनेच्या विविध उपक्रमांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. अभियानाच्या माध्यमातून: प्रधानमंत्री आवास योजना PMAY-G टप्पा १ आणि २०२४-२५ पूर्वीच्या राज्य योजनांतील 17,859 घरकुले व PMAY-G टप्पा २ तसेच २०२४-२५ पासूनच्या राज्य योजनांतील 54,238 घरकुले अशी एकूण 72,097 घरकुले आत्तापर्यंत पूर्ण झाली आहेत. या व्यतिरीक्त सुमारे ३० लाख घरकुलांची कामे प्रगतीपथावर असून या कालावधीत 6,075 भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याचे पक्के घर या उद्दिष्टाकडे ग्रामविकास विभाग सातत्याने वाटचाल करत. यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामीण आवास योजनांसाठीच्या उपक्रमांमध्ये झालेल्या प्रगतीबाबत मंत्री गोरे यांनी समाधान व्यक्त करुन राज्य व क्षेत्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांच्या यशस्वी कामगिरीबद्दल कौतुक केले.
मंत्री गोरे यांनी सांगितले की, ग्रामीण महाराष्ट्र सक्षम करायच्या उद्दीष्टाने घरकुल पूर्णतेचा वेग अधिक वाढवावा. लाभार्थी केंद्रित दृष्टिकोनाने काम करावे. भूमिहीन लाभार्थ्यांवर विशेष लक्ष देण्यात यावे. तसेच लाभार्थ्यांना मनरेगा (MGNREGA) अंतर्गत मजुरीचा लाभ मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात यावी. PMAY-G टप्पा २ मधील घरकुलांना सौरऊर्जेचा लाभ देण्यावर भर द्यावा. यासोबतच नाविन्यपुर्ण (Innovative) उपक्रम राबवण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांना गोरे यांनी निर्देश दिले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्ग दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते दि ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा एक आणि राज्य पुरस्कृत योजनेतील १ एप्रिल २०२५ पुर्वीचे आणि नवीन घरकुले अभियान कालावधीत पूर्ण करणे, घरकुल मंजूर झालेल्या परंतु जागा नसलेल्या सर्व पात्र भूमिहीन लाभार्थ्यांना अभियान कालावधीत जागा उपलब्ध करून देणे, सर्व मंजूर घरकुल लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत लाभ देणे, प्रधानमंत्री सुर्यघर योजना/अन्य योजनेतून टप्पा-2 मधील मंजूर सर्व घरकुलांना सौर ऊर्जा प्रकल्प बसवणे, असे उपक्रमनिहाय उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.