
शिर्डी (Shirdi) : सावळीविहीर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाची तिसरे रिटेंडर रद्द करण्यात आले. आता हा रस्ता डांबरीऐवजी काँक्रिटचा होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. लोकसभेत शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
७५ किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. रस्त्यात २५ किलोमीटर अंतरात दुकाने आणि हाॅटेल आहेत. या हाॅटेल मालकांची लाॅबी आपापल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीला पुढे करून साईडपट्ट्यांची खोदाई व्यवस्थित करू देत नाहीत. भुयारी मार्ग आणि उड्डाणपुलांना आडकाठी करते. त्यामुळे गेल्या वीस वर्षांत रस्ते अपघातात अनेकांचे बळी गेले. रस्ता खड्ड्यात गेला आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च अक्षरशः वाया गेला. आता तरी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी हा रस्ता मजबूत व्हावा, यासाठी या काँक्रिटीकरणाला सहकार्य करणे गरजेचे आहे. काँक्रिटीकरणामुळे रस्त्याची उंची वाढेल आणि आपल्या दुकानात अथवा हाॅटेलात पाणी शिरेल. भुयारी मार्ग केल्यास आपल्या मालमत्तेचे नुकसान होईल. उड्डाणपूल केल्यास बाजारपेठेवर परिणाम होईल. यामुळे या पंचवीस किलोमीटर अंतरातील व्यावसायिकांचा, रस्ता काॅंक्रिटचा करण्यास विरोध होता. त्यांच्या विरोधामुळे हा रस्ता सरसकट डांबरी केला जाणार होता. डांबरी रस्ता दोन वर्षे देखील टिकला नसता. आता काँक्रिटचा रस्ता करण्याचे गडकरी यांनी मनावर घेतले. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा पल्लवित झाल्या. त्याला सर्व लोकप्रतिनिधींचा साथ लाभल्यास हा रस्ता सावळीविहीर ते कोपरगाव राष्ट्रीय महामार्गासारखा मजबूत होऊ शकेल.
सावळीविहीर ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गाचे कामाचे टेंडर यापूर्वी दोन ठेकेदारांनी नियोजित खर्चाच्या तीस ते चाळीस टक्के कमी दराने भरले. काम अर्धवट टाकून ते पळून गेले. त्यांनी दिलेली बॅंक गॅरंटी देखील बनावट असल्याने निष्पन्न झाले. निकष शिथिल केल्याने हे घडले. आता निकष पूर्वीप्रमाणे ठेवले जातील. त्यामुळे असे प्रकार पुन्हा होणार नाहीत.
-नितीन गडकरी, मंत्री, केंद्रीय रस्ते विकास (लोकसभेतील माहिती)
लोकप्रतिनिधींची भूमिका समान हवी
आता महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि महायुतीच्या आमदारांनी याप्रश्नी समान भूमिका घ्यावी. समान भूमिका घेतल्यानंतरच जिल्ह्यातील जनतेची या मृत्यूचा सापळा ठरलेल्या रस्त्याच्या संकटातून सुटका होईल.
- येत्या पंधरा दिवसांत निविदा जाहीर होणार.
- सुमारे दोन ते अडीच हजार कोटी रुपये खर्चाचे हे काम
- काम होईपर्यंत रस्त्याची डागडुजी केली जाणार