
पुणे (Pune) : महापालिकेने गणेशोत्सवात तब्बल एक कोटी ३५ लाख रुपयांचे टेंडर काढून १५० फिरते हौद घेतले. पण या टेंडरमध्ये फिरत्या हौदांसाठी जी वाहने वापरण्यात आली, त्यामध्ये अनेकांचा विमा संपलेला होता, तसेच १० वर्षांपेक्षा जास्त वापर झालेली वाहने वापरण्यात आली. यामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे माहिती अधिकार कायद्यातून समोर आले आहे.
पुणे महापालिकेने यंदाच्या गणेशोत्सवात फिरत्या हौदाची व्यवस्था केली होती. यावर्षी कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्याने या फिरत्या हौदाची गरज नाही, असे प्रशासनातील अधिकाऱ्यांची भूमिका होती, पण तरीही टेंडर काढण्यात आले. ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधीत १५० फिरते हौद पुरविण्यात आले.
महाराष्ट्र लहुजी आर्मीचे विशाल सकट यांनी माहिती अधिकार कायद्यातून यासंदर्भात माहिती मागवली. त्यांनी वाहनांची माहिती, विमा, पीयूसी ही माहिती मागवली, पण अपुरी माहिती प्रशासनाने दिली. ही टेंडर प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आलेली नाही. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी पूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे या टेंडरचे बिल आदा करू नये व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सकट यांनी केली आहे.
वापरलेल्या १५० पैकी अनेक वाहनांचा विमा हा यापूर्वीच संपलेला होता, त्याचे नूतनीकरण न करता ती वाहने विसर्जनासाठी वापरली. सर्व वाहनांचे आयुर्मान १० वर्षाच्या आत असावे, अशी अट होती, पण अनेक वाहने, ११ वर्षापेक्षा जास्त काळ धावलेली होती. ज्या वाहनांचा वापर करण्यावर बंदी होती ती वाहने विसर्जनात वापरली. अनेक अटींचे यात उल्लंघन झाले आहे, असा आरोप सकट यांनी केला आहे.
तक्रारींचा विचार करणारः राऊत
घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत या संदर्भात म्हणाल्या की, फिरत्या हौदाचे अद्याप बिल दिले गेलेले नाही. या टेंडरसंदर्भातील ज्या तक्रारी आल्या आहेत त्यांचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाईल.