
मुंबई (Mumbai) : ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात लवकरच केंद्र सरकारच्या अनुदानातून नव्या ईलेक्ट्रिक आणि २० सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. लवकरच त्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
ठाणे परिवहन सेवेच्या तब्बल १५३ बसेस या मागील कित्येक वर्षांपासून कळवा आणि वागळे आगारात पडून होत्या. कायद्यानुसार ज्या बसेस दहा वर्ष जुन्या असतील किंवा त्या सहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक धावल्या असतील. अशा बसेस या भंगारात विक्रीसाठी काढल्या जातात. अशा प्रकारे नादुरुस्त आणि मुदत संपलेल्या बसेस आगारात उभ्या होत्या. या नादुरुस्त भंगारातील बसेसच्या लिलावाची ऑनलाईन प्रक्रिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेत दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, बंगळूरू आदी शहरातील भंगार विक्रेत्यांनी सहभाग घेतला. या प्रक्रियेतून ५ कोटी ८२ लाख इतकी रक्कम ठाणे परिवहन सेवेला प्राप्त झाली होती. आता या रक्कमेतून ठाणे परिवहन सेवेने २० सीएनजी बसेस विकत निश्चित केले असून केंद्र सरकारच्या अनुदानातून नवीन इलेक्ट्रिक बसेसही नवीन वर्षात परिवहन ताफ्यात दाखल होणार आहे.
या दोन्ही बसेसचे वेगळेपण असावे, याकरिता ठाणे परिवहन समिती प्रयत्नशील होती. त्यानुसार बुधवारी २१ डिसेंबरला पार पडलेल्या परिवहन समितीच्या बैठकीत यावर प्रदीर्घ अशी चर्चा झाली. या चर्चेअंती या बसेसचा रंग हा लालच असेल पण दोघांमध्ये फरक असावा, याकरिता इलेक्ट्रिक बसेसला मधोमध हिरव्या रंगाचा पट्टा तर सीएनजी बसेसच्या मध्ये हिरवा आणि पिवळा रंगाचा पट्टा ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. त्याला परिवहन समिती सदस्यांनी मान्यता दिली आहे. नवीन येणाऱ्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेसच्या वेगळेपणाबाबत बुधवारच्या बैठकीत चर्चा झाली. यात प्रत्येक सदस्याने आपले मत मांडले. अखेर इलेक्ट्रिक बसेसच्या मधोमध हिरवा तर सीएनजी बसेसच्या मध्ये पिवळा हिरवा रंगाचा पट्टा असेल यावर सर्वांचे एकमत झाले आहे, अशी माहिती ठाणे परिवहन सेवा समितीचे सभापती विलास जोशी यांनी दिली.