
औरंगाबाद (Aurangabad) : मनपाने स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च करुन शहरातील विविध मार्गांवर सायकल ट्रॅकची निर्मिती केली आहे, मात्र वर्षभरातच त्याची पार वाट लागली आहे. आता भरीस भर म्हणून मनपाने शहरातील ४५ वळणमार्गांवर सायकल ट्रॅकप्रमामेच हे रबरी बोलार्ड लावण्याचे काम सुरू केले आहे. यासाठी जवळपास तीन कोटी रूपये खर्च होत आहेत. मात्र, स्मार्ट सिटीच्या सायकल ट्रॅकप्रमाणेच त्यांचीही अवस्था दिसत आहे. त्यामुळे करदात्यांचा पैसा कंत्राटदाराच्या घशात ओतण्यासाठी की अधिकाऱ्यांचा खिसा वाढवण्यासाठी हा उपक्रम सुरू असल्याचे दिसत आहे.
मनपाने स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून चार कोटी रुपये खर्च करुन शहरात सायकल ट्रॅकची निर्मिती केली आहे. अनेक रस्त्यांवर हे काम उखडलेले दिसत आहे, काही रस्त्यांवरील सायकल ट्रॅकसाठी लावलेले रबरी बोलार्ड नागरिकांनी उखडून टाकले आहेत. त्यामुळे यावरचा खर्च वाया गेल्याचे सष्टपणे दिसत आहे. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या प्रकल्प अभियंत्यासह सहाय्यक अभियंत्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत ज्या ज्या शहरांचा समावेश झाला त्या त्या शहरांना सरकारने शहराच्या काही भागांमध्ये सायकल ट्रॅक तयार करण्याची सूचना केली आहे. 'सायकल फॉर चेंज' असे नाव या उपक्रमाला देण्यात आले आहे. नागरिकांनी सायकलचा वापर जास्तीत जास्त करावा. सायकल चालवणे आरोग्यासाठी व तंदुरुस्तीसाठी (फिटनेस) चांगले असते असा संदेश देत मनपाने स्मार्ट सिटी योजनेची मदत घेत क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन, कॅनाॅट गार्डन, प्रोझोन माॅल ते कलाग्राम तसेच शहरातील विविध चौकात रस्त्यांवर रस्त्याच्या मधोमध डाव्या उजव्या बाजूने सायकल ट्रक तयार केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सायकल ट्रॅकसाठी स्मार्ट सिटी योजनेतून तब्बल चार कोटींची तरतूद करण्यात आली. शहराच्या विविध भागात मुख्य रस्त्यांच्या बाजूने सायकल ट्रॅक तयार करण्याचे काम केले आहे. त्यात मध्यवर्ती जकात नाका ते एमजीएम आणि डॉ. सलीम अली सरोवर ते टीव्ही सेंटर चौक या रस्त्यांवर देखील सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन दरम्यान तयार करण्यात आलेल्या पहिल्या सायकल ट्रॅकचे उद्घाटन राज्याचे तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी २०२१ मध्ये झाले होते. मात्र काही महिन्यातच शहरातील सर्वच सायकल ट्रॅकची अवस्था बिकट झाली आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूने सुमारे अडीच ते तीन मीटर जागा सायकल ट्रॅकसाठी सोडण्यात आली असून, अडीच ते तीन मीटर अंतरावर रबरी बोलार्ड लावण्यात आले आहेत. परंतु आता अनेक बोलार्ड नागरिकांनी तोडून टाकल्याचे चित्र या रस्त्यांवर पाहण्यास मिळते. त्यामुळे तुटक तुटक स्वरुपात या मार्गावर सायकल ट्रॅकचे दर्शन होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या अजय मेहता या बोलार्ड उद्योजकाकडुन फिटींगसह ७९८ रूपये प्रती नगाप्रमाणे हे बोलार्ड स्मार्ट सिटी प्रशासनाने खरेदी केलेले आहेत. बोलार्डसह सायकल ट्रॅकच्या मधोमध लावलेल्या प्लास्टीक कुंड्या देखील तुटल्याने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार केलेले हे सायकल ट्रॅक आता शहराचे विद्रुपीकरण करत आहेत. विशेष म्हणजे जे बोलार्ड उभे आहेत ते वाहनाच्या धुराने काळवंडल्याने विद्रुपीकरणात अधिक भर पडली आहे.असे असताना स्मार्ट सिटीच्या पावलावर पाउल ठेवत मनपा प्रशासकांच्या आदेशाने शहरातील वर्दळीच्या मार्गावरील रस्त्यांवर ४५ ठिकाणी डाव्या आणि उजव्या बाजुने अशाच पध्दतीने रस्ते खोदुन मनपाने तीन कोटीचा चुराडा केल्याचे दिसत आहे.
प्रशासनातील कारभारी बोलेनात
यासंदर्भात प्रतिनिधीने मनपा प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ डाॅ. अभिजित चौधरी, स्मार्ट सिटीचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी सौरभ जोशी यांच्याशी संपर्क केला. व्हाॅटसपवर फोटो देखील पाठवले. मात्र त्यांच्याकडुन प्रतिसाद मिळाला नाही.