
वर्धा (Wardha) : शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून येथील नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर करण्याची धडपड सुरु आहे. त्यामुळे भूखंडासह घरांच्याही किमती वाढत असून त्या तुलनेत सोयी-सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. विशेषतः शहरातील गुळगुळीत रस्त्यांवर अमृत योजनेतून खोदकाम केल्याने वाटचालही आता खडतर झाली आहे.
शहरामध्ये 19 प्रभाग असून या प्रभागातील नगरसेवकांनी काही ठराविक भागातीलच विकास केला आहे. आपल्याला धक्का लागता कामा नये म्हणून सिमेंटीकरणावर डांबरीकरण करुन रस्ते गुळगुळीत करुन घेतले. तर दुसरीकडे रस्त्यांची दुरुस्तीच केली नसल्याने खड्डेमय मार्गावरुन ये-जा करावी लागते. शहरात सिमेंट रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले मात्र, अल्पावधीतच त्या रस्त्याला तडे गेल्याने आता वाहतूकही प्रभावित होत आहे. अनेक प्रभागातील नाल्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नसल्याने रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पहायला मिळतात. अमृत योजनेने रस्त्यांची वाट लावली आहे.
घरे महाग पण, सुविधांकडे दुर्लक्ष
वर्धा शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून या ठिकाणच्या भूखंडाचे आणि घरांचेही दर दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु त्या तुलनेत सोयी- सुविधा अपुरा पडत असल्याचे चित्र आहे. शहरातील काही ठराविक भागातील विकास कामांवरच भर दिला जात असल्याचे दिसते. स्थानीय नागरिकाने सांगितले की, घरासमोरील नाली बुजली असल्यामुळे सांडपाणी वाहून जाण्याकरिता अडचण निर्माण झाली आहे. या नालीतून वाहत येणारे प्रभागातील सांडपाणी घरासमोरील रस्त्यावरुन वाहत आहे. यासंदर्भात नगरपालिकेला वारंवार सूचना केल्या. निवेदनही दिले तरीही नालीच्या पावसाळ्यात पायी चालनेही कठीण झाले आहे. शहरात विकासाच्या नावावर रस्ता, नाल्यांचे बांधकाम करण्यात आले. परंतु यामध्ये समन्वयाचा अभाव आणि तांत्रिकदृष्ट्या अनेक चुका असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच भागामध्ये नाल्यांवर अतिक्रमण केल्याने नाल्या बुजल्या आहे. त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील पाणी पावसाळ्यात रस्त्यांवर जमा होते. यातून वाट काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.
दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा
पावसाळा असो की हिवाळा, वर्धेकरांना दोन किंवा तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्यामध्ये यातील अंतर वाढविले जाते. शहरात पाण्याची टंचाई नसून पाणी बचतीकरिता पालिकेकडून प्रयत्न केले जात आहे.
घरात साचते पाणी
शहरामध्ये सिमेंटीकरण आणि रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. रस्त्याचे बांधकाम करताना खोदून बांधकाम न केल्याने सिमेंट रस्त्यांची उंची वाढून घर खाली गेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवरील पाणी नागरिकांच्या घरात शिरत असल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात अनेकांच्या घरातील साहित्य भिजत असतात.
नाल्याच्या कामाकडे होताहेत दुर्लक्ष
शहरातील काही भागात नाल्यांचे बांधकाम झाले पण, काही भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील नाली बुजली असून त्या नालीच्या बांधकामासाठी लक्ष दिले जात नसल्याने सांडपाणी रस्त्यावर साचून रहात आहे. पावसाळ्यात या भागात नागरिकांना त्रास होतो. बांधकामाकडे लक्ष दिले नाही. पावसाळ्यात या भागात सर्वत्र पाणी साचून मार्गक्रमण करताना अडचणींचा सामना करावा लागतो. या सांडपाण्यामुळे आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.