
नागपूर (Nagpur) : वाढते नागरीकरण आणि विभक्त कुटुंबीय पद्धतीमुळे शहरात दरवर्षी शेकडो बहुमजली इमारती उभ्या राहत आहे. या आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत सहाशे बहुमजली इमारतींसह घर बांधकामाचे नकाशे महापालिकेच्या नगर रचना विभागाने मंजूर केले आहेत. त्यामुळे बिल्डिर लॉबी सध्या फार्मात आली आहे.
राज्याच्या उपराजधानीच्या शहराची वाटचाल झपाट्याने होत आहे. गेल्या काही वर्षात मेट्रो, उड्डाणपूल, रुंद व प्रशस्त रस्त्यांमुळे नागपूरची जागतिक पातळीवरही ओळख निर्माण झाली आहे. वैद्यकीय सुविधा, उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधांसोबतच दळणवळणाच्या सोयीमुळेही ग्रामीण भागातीलच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकही आता नागपुरात स्थायिक होऊ पाहात आहे. यातूच बिल्डरांनाही बहुमजली इमारती बांधण्याची तसेच डेव्हलपर्सला ले-आऊट टाकण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.
परिणामी नव्या इमारतींच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात महापालिकेत अर्ज येत आहेत. यात वैयक्तिक घरांसोबतच बहुमजली इमारतींचासाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांत बहुमजली इमारतींचे जाळेच शहरात तयार झाले आहे. आता शहरात राहण्यासाठी भूखंड किंवा घरे मिळत नाही. त्यामुळे अनेकजण फ्लॅट खरेदी करीत आहे. त्यामुळे शहरातील बहुतेक बिल्डर मोठे प्लॉट खरेदी करून त्यावर टोलेजंग इमारती उभ्या करीत असल्याचे महापालिकेकडे आलेल्या बांधकाम परवानगी अर्जावरून दिसून येत आहे.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या नगररचना विभागाने एकूण ५८७ इमारत बांधकामाला परवानगी दिली आहे. यात प्रत्यक्ष २६६ अर्जांना तर ऑनलाईन प्रणालीद्वारे ३२१ इमारतींना परवानगी देण्यात आली आहे. अर्थात ही नऊ महिन्यातील आकडेवारी आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत आणखीही परवानगी दिली जाणार आहे. यात आणखी दोनशे इमारतींची भर पडण्याची शक्यता आहे. याशिवाय नगररचना विभागाने सात भूखंडांचे एकत्रिकरण करण्यास परवानगी दिली असून २९ भूखंडांचे प्रत्येकी दोन भाग केले. एकत्रिकरण करण्यात आलेल्या भूखंडांवर निश्चितच बहुमजली इमारती उभ्या राहणार आहेत. ३८ इमारतींना पूर्ण झाल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.