‘मॅक्स एरोस्पेस’ नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना; 8000 कोटींची गुंतवणूक

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नागपुरात सुमारे 8 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती कारखाना उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि. आणि महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात नागपूरमध्ये हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरमधील संरक्षण उत्पादन क्षेत्राला यामुळे गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी सांगितले.

Devendra Fadnavis
Mumbai Metro News : मेट्रोची सफर एका क्लिक वर; आता फक्त टॅप करा अन् प्रवास सुरू करा

सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात उद्योग विभागाचे सचिव पी अन्बलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते. अन्बलगन आणि मॅक्स एरोस्पेसचे अध्यक्ष भरत मलकानी यांच्यात हा सामंजस्य करार झाला. या करारानुसार मॅक्स एरोस्पेस नागपूर येथे हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभारणार असून त्याचे प्रत्यक्ष काम 2026 पासून सुरू होणार आहे. या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे दोन हजार रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पात आठ वर्षांमध्ये सुमारे 8 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. हा करार भारताच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला चालना देणारा टप्पा ठरणार आहे. हेलिकॉप्टरचे कस्टमायझेशन आणि पूर्ण उत्पादन यासाठी समर्पित असलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असेल. या उपक्रमामुळे महाराष्ट्र हे एरोस्पेस उत्पादनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येणार आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : 381 सिंचन प्रकल्प, 45 उदंचन जलविद्युत प्रकल्पांची कामे मिशन मोडवर करा; 96 हजार रोजगार निर्मिती

या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाचा समावेश असून, रोटरी-विंग प्लॅटफॉर्म्सचे कस्टमायझेशन, इंटिग्रेशन आणि फ्लाइट टेस्टिंग यासाठी हे उत्कृष्टता केंद्र (सेन्टर ऑफ एक्सलन्स) म्हणून कार्य करणार आहे. नागपूर विमानतळाजवळ हे केंद्र असल्यामुळे विद्यमान पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक सपोर्टचा लाभ घेता येणार आहे. यामुळे भारताच्या वाढत्या एरोस्पेस पुरवठा साखळीतही योगदान मिळणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मॅक्स एरोस्पेसने हेलिकॉप्टर उत्पादनासाठी महाराष्ट्र विशेषतः नागपूरची निवड केल्याचा आनंद आहे. मॅक्स एरोस्पेसच्या व्यवसायाच्या प्रवासात राज्य शासनही सहभागी आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी नागपूरमध्ये चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. मॅक्स एरोस्पेसला त्यांच्या उत्पादन कारखान्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. कंपनीने आपले उत्पादनाचे काम ठरलेल्या वेळेत सुरू करावे.

Devendra Fadnavis
Mumbai-Goa Highway : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे; अजित पवार यांचे निर्देश

मलकानी यांनी नागपूरमध्ये संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी परिपूर्ण परिसंस्था असून उत्पादन निर्मितीसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्या असल्याचे सांगितले. मी मूळचा महाराष्ट्राचा असल्याने महाराष्ट्रातच उत्पादन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हेलिकॉप्टर उत्पादन निर्मिती क्षेत्रात महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ही भागीदारी महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, भारताला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यास हातभार लावणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी मॅक्स एरोस्पेचे अध्यक्ष भरत मलकानी, व्यवसाय विकासच्या प्रमुख मेघना मलकानी, मुख्य आर्थिक अधिकारी किरीट मेहता, अध्यक्ष जयेश मेहता, सल्लागार नीरज बेहेरे, सल्लागार देवदत्त वानरे आदी उपस्थित होते.

सामंजस्य कराराचा तपशील:

प्रकल्पाचे नाव : हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना

ठिकाण : नागपूर

गुंतवणूक : 8000 कोटी (8 वर्षांत)

रोजगार संधी : 2000

प्रस्तावित प्रारंभ वर्ष : 2026

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com