
नागपूर (Nagpur) : इंग्रजी भाषा प्रयोगशाळेसाठी राज्य सरकारच्या 2022-2023 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 41 कोटी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी संबंधित शाळांना साहित्य पुरविण्याचे आदेश कंत्राटी एजन्सीला देण्यात आले होते. ज्या शाळेत ही सुविधा दिली जाईल, त्या शाळेतील इंग्रजी शिक्षकाला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी कंत्राटी एजन्सीवर देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 13 शाळांमध्ये इंग्रजी भाषेची प्रयोगशाळा सरकारी शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने संपूर्ण शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील एक हजार शाळांमध्ये संगणकीय इंग्रजी भाषा प्रयोगशाळेचा अभिनव वापर करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी नागपूर जिल्ह्यातील 13 शाळेंचा समावेश असून, त्यात महापालिकेच्या 3 शाळा आणि जिल्हा परिषदेच्या 10 शाळांचा समावेश आहे. नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे आणि इतर एजन्सीच्या तर्फे शैक्षणिक गुणवत्ता परिणाम काढण्यात आला. राज्यभरातील 1000 शाळांमध्ये इंग्रजी भाषा प्रयोगशाळांसह प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्याचाच दुवा म्हणून इंग्रजी भाषा प्रयोगशाळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या संजय नगर हायस्कूल, एमएके आझाद हायस्कूल आणि ताजाबाद हायस्कूलची निवड झाली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये जि.प. हायस्कूल काटोल रोड व पारशिवनी तहसील 2, हिंगणा 1, कुही 1, मौदा 1, सावनेर 1, भिवापूर 1 आणि रामटेक तालुक्यातील 2 शाळांचा समावेश आहे.
शाळांना दिले जाईल सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर
इंग्रजी भाषा प्रयोगशाळा प्रकल्पात निवडल्या गेलेल्या शाळांमध्ये संगणक, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर उपलब्ध केले जाईल. राज्य स्तरावर याचा ई-टेंडर काढला गेला आहे. स्किल ट्री कन्सल्टिंग प्रा. लि. कंपनीची निविदा मंजूर झाली आहे. राज्यभरातील 1000 शाळांमध्ये इंग्रजी भाषा प्रयोगशाळांसाठी संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर पुरविण्याचे कंत्राट या कंपनी ला देण्यात आले.