
नागपूर (Nagpur) : नागपूरात नेहमीच ट्राफिकने भरलेला परिसर म्हणजे लोहापूल. लोहापूलाच्या खाली नेहमीच गाड्यांचा जाम लगलेला पाहायला मिळतो. पावसाळ्यात तर लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच महामेट्रोने लोहापूल येथे नवीन अंडरब्रिज बनवायचा निर्णय घेतला. परंतू अंडरब्रिजच्या कामात सातत्याने विलंब होत आहे. या पूलाचे काम २१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा दावा महामेट्रोकडून करण्यात आला होता. बांधकामाची गती एवढी मंदावली आहे की आजपर्यंत हे आरयूबी पूर्ण झालेले नाही.
आता ते फेब्रुवारी-२०२३ पर्यंत तयार होईल असा दावा केला जात आहे आणि मार्चमध्ये त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरयूबीच्यावरच्या भागाचे काही काम अजूनही बाकी आहे. याशिवाय रस्त्याचे सपाटीकरण आणि मार्गात काही बदल करण्याचे कामही रखडलेले आहे. काही ठिकाणी बदलही केले जात आहेत, त्यामुळे पूल तयार करण्यास वेळ लागत आहे. महामेट्रोकडून कंत्राट मिळाल्यानंतर नॅशनल कन्स्ट्रक्शन कंपनी लि. द्वारे हे बांधकाम करण्यात येत आहे. लोहापूल कॉम्प्लेक्स येथे निर्माणाधीन पुश बॉक्स आरयूबी ४७ मीटर लांब, १२ मीटर रुंद आणि ४.५ मीटर उंच आहे. यामध्ये दोन समांतर पुश बॉक्स (२ बाय २) तयार करण्यात आले असून त्यापैकी एका पुश बॉक्सवर १.५ मीटर रुंद फूटपाथ तयार करण्यात आला आहे.
तुलसीदासांचा पुतळा सुरक्षित ठिकाणी नेण्यात आला.
ब्रिटीशकालीन लोहापूल तसाच ठेवून मानस चौक ते कॉटन मार्केट चौकापर्यंत अंडरब्रिजमार्गे वन-वे करण्यात येत आहे. कॉटन मार्केटकडून टेकडी रोडकडे येण्यासाठी लोहापुलखालून रस्ता खुला राहील. मानस चौक जंक्शन सुधारण्याचीही योजना आहे. हा मार्ग शून्य अपघात स्थळ म्हणून तयार करण्यात येत आहे. मानस चौक ते जयस्तंभ चौक दरम्यान ९५० मीटर लांबीचा ६ लेन रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्याच्या कामासाठी मानस चौकातून गोस्वामी तुलसीदास यांचा पुतळा काढण्यात आला आहे. कॉटन मार्केटजवळील कल्व्हर्टच्या बांधकामाच्या ठिकाणी हा पुतळा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. रस्त्याच्या बांधकामानंतर गोस्वामी तुलसीदास यांचा पुतळा मूळ स्वरूपात बसवला जाणार आहे.
उद्घाटनाची जबाबदारी पीडब्ल्यूडीची
फेब्रूवारी या महिन्या अखेरीस लोहापूल आरयूबी पूर्णपणे तयार होईल. आरयूबीच्या आतील भागात काही बदल करण्यात येत असून, त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. पूल तयार होताच मार्चमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात येईल. या पूलाच्या उद्घाटनाचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार आहे. अशी माहिती महामेट्रो चे डीजीएम अखिलेश हळवे यांनी दिली.