
नागपूर (Nagpur) : मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स तयार केले जातील, तसेच येथे अत्याधुनिक सुविधा असलेले मॉड्युलर आयसीयू युनिट स्थापन केले जातील याशिवाय याठिकाणी अनेक विकासकामे होणार असून, त्यामुळे जुन्या मेडिकलचा चेहरामोहरा बदलणार आहे. 283 कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी लवकरच टेंडर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
514 कोटींचा प्रस्ताव मंजूर
गेल्या वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी मेडिकलला भेट दिली होती. त्यावेळी मेडिकलमध्ये अनेक सुविधा आणि साधनांचा अभाव दिसून आला, त्यामुळे त्यांनी मेडिकलमध्ये बदल करून येथील विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्याची मागणी वैद्यकीय प्रशासनाला केली होती. त्यानंतर मेडिकलच्या विकासासाठी 514 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी 283 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. त्याची टेंडर प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. येत्या 30 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता डीन डॉ. राज गजभिये यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय उर्वरित 231 कोटी रुपयांची मागणीही करण्यात आली आहे. येत्या आर्थिक वर्षातही ही रक्कम मिळणे अपेक्षित आहे.
स्काय वॉकचा लाभ रुग्णांना मिळणार
283 कोटी रुपयांमधून अनेक विकासकामे करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. डीन यांच्या म्हणण्यानुसार, येथील 250 एकर परिसरात सुरक्षा भिंत बांधली जाणार आहे. ही भिंत पूर्ण झाल्यावर वैद्यकीय संकुलाचे सर्व बाजूंनी संरक्षण होणार आहे. येथे भव्य सभागृह बांधण्यात येणार आहे. ट्रॉमा सेंटर ते अपघातग्रस्तापर्यंत स्काय वॉक करण्यात येणार आहे. खालून वाहतूक सुरू होईल. स्काय वॉकमधून रुग्णांना कोणतीही अडचण न होता सेवा मिळण्याचा नवीन मार्ग मिळणार आहे. विद्यार्थिनींसाठी 400 विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. सोबतच 80 बेडची क्षमता असलेला आधुनिक पेइंग वॉर्ड तयार करण्यात येणार आहे.
दुसरा टप्प्यातिल महत्वाकांक्षी योजना
231 कोटीच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक विकासकामे प्रस्तावित आहेत. यामध्ये लॉन्ड्री आणि किचनचे नूतनीकरण, कौशल्य प्रयोगशाळा, ओपीडी, सेंट्रल लॅब, कॅफे हाऊस, ट्रॉमा केअर सेंटरचे नूतनीकरण आणि सुधारणा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, वीज यंत्रणेचे नूतनीकरण आदी केले जाणार आहे. येत्या काळात मेडिकलचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. असे डीन डॉ. राज गजभिये यांनी सांगितले.