गडचिरोलीसाठी गुड न्यूज! जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 80 कोटींची मान्यता

जलतरण तलाव, विविध मैदाने आणि क्रीडा वसतिगृहानंतर आता टप्पा-२ मधील सुविधांसाठी निधी; उच्चाधिकार समितीच्या मंजुरीनंतर मंत्रिमंडळाची मान्यता
Sports Complex
Sports ComplexTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात टप्पा-२ अंतर्गत विविध क्रीडा सुविधा उभारण्यासाठी ८० कोटी १२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात संधी मिळावी, तसेच स्थानिक खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा प्रकल्प राबविला जात आहे.

Sports Complex
महाराष्ट्राच्या सागरी विकासाला गती; Water Metro, Dighi Shipbuilding सह 7 प्रकल्पांना मंजुरी

जिल्हा क्रीडा संकुलासाठी यापूर्वी २३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून जलतरण तलाव, कबड्डी, खो-खो आणि व्हॉलीबॉलची मैदाने, बास्केटबॉल सिमेंट कोर्ट, बॅडमिंटन हॉल तसेच क्रीडा वसतिगृहाची कामे पूर्ण झाली आहेत. या सुविधा नागरिक आणि खेळाडूंसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.

टप्पा-२ मधील कामांना मंजुरी

नवीन जागेवर व्यायामशाळेसह प्रशासकीय इमारत आणि चार कोर्टचा इनडोअर बॅडमिंटन हॉल पूर्ण झाला आहे. डोम टाईप मल्टीगेम हॉलचे सुमारे ८० टक्के कामही पूर्ण झाले आहे.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या टप्पा-२ मधील उर्वरित कामांसाठी ८० कोटी १२ लाख रुपयांचा निधी मिळावा, यासाठी क्रीडा संचालनालयाने प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला १७ जून २०२६ रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आता मंत्रिमंडळानेही मान्यता दिल्याने निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Sports Complex
Nadhavade MIDC: सिंधुदुर्गच्या नाधवडे एमआयडीसीच्या विकासाला वेग; 15 कोटींच्या कामांची तयारी

गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या सुविधांमुळे स्थानिक खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांसाठी तयारी करण्यासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Key Points

  • गडचिरोली जिल्हा क्रीडा संकुलाच्या टप्पा-२ साठी ८० कोटी १२ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता,

  • क्रीडा संकुलासाठी यापूर्वी २३ कोटी रुपयांचा निधी वितरित,

  • जलतरण तलाव, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉलच्या सुविधा पूर्ण,

  • बॅडमिंटन हॉल आणि क्रीडा वसतिगृहाचे काम पूर्ण,

  • व्यायामशाळा, प्रशासकीय इमारत आणि चार कोर्टचा इनडोअर बॅडमिंटन हॉल पूर्ण,

  • डोम टाईप मल्टीगेम हॉलचे ८० टक्के काम पूर्ण,

  • टप्पा-२ साठीच्या प्रस्तावाला १७ जून २०२६ रोजी उच्चाधिकार समितीची मंजुरी,

  • आता मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा.

Tendernama
www.tendernama.com