नागपुरचा होणार झपाट्याने विकास; 552 कोटींच्या कामांचे झाले भुमिपूजन
नागपूर (Nagpur) : विकास कामात आघाडीवर असलेले महानगर म्हणून नागपुरकडे पाहिल्या जाते. भविष्यातील सर्व बाबींच्या गरजा लक्षात घेऊन आपण पायाभूत सुविधांच्या विकासापासून नियोजन केले आहे. विकासाचा हा टप्पा मेट्रोच्या जाळ्यापर्यंत आपण पुढे आणला आहे. या महानगरात काम करणाऱ्या कष्टकरी, दूर्बल घटकातील लोकांनाही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. मनपाच्या जागेवरील भाडेपट्टा पंजीबध्द झालेल्या झोपडीधारकांना पट्टे वाटप करुन आता स्वत:च्या घराचे त्यांचे स्वप्न साकार करुन दाखवू असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.
राजे संभाजी चौक (नागोबा मंदिर चौक) आय.टी. पार्क, मेन रोड येथे नागपूर महानगरपालिकेच्या वतीने “दक्षिण-पश्चिम नागपूर व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ येथील सिमेंट काँक्रीट रस्ते, सोनेगांव तलावाचे सौंदर्यीकरण व ई-बसेसचे तसेच विविध आयुष्मान आरोग्य मंदिराचे लोकार्पण व भूमिपूजन” समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. महानगरात गोरगरीबांना आपल्या घराचे स्वप्न साकार होणे सोपे नसते. शासनाच्या घरकूल योजनांचा लाभ घेण्यासाठी ज्या ठिकाणी ते राहत आहेत त्या जागेची मालकी/पट्टा त्यांच्या नावावर असणे आवश्यक असते. या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेने कायद्याच्या चौकटीत हजारो लोकांना पट्टे देऊन आता त्यांचे स्वप्न साकार होण्यास मोलाची मदत केल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री घरकूल आवास योजने अंतर्गत नागपुरात हजारो घरे वंचितांना मिळतील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ग्रीन सिटी असणाऱ्या नागपूर शहरात डिझेल आणि पेट्रोल सारख्या पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापराऐवजी ई-बसेस सारख्या वाहनांचा सर्वाधिक वापर व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरात सुरु असलेल्या इतर बसेस हळुहळु कमी करुन ई-बसेस व अपारंपारिक स्त्रोत व ग्रीन एनर्जीवर चालणाऱ्या बसेसची संख्या वाढवून नागपूर शहराचा देशात नावलौकिक वाढवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिला दिनाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटीबद्ध असून शिक्षणापासून रोजगारापर्यंत, रोजगारापासून आरोग्यापर्यंत शासनाने विचार करुन नियोजन केले आहे. शासनाने नवीन जाहीर केलेल्या महिला धारेणात आता प्रत्येकाला वडीलांसमवेत आपल्या आईचे नावही लिहावे लागेल असे सांगून त्यांनी मातृशक्तीला वंदन केले. मी देखील आता देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असे नाव लावणार असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. नागपूर शहर बदलत आहे. शहराचा चौफेर विकास होत असून, सर्वांगिण विकासासाठी नागपूरला देशातील प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून ओळखले जावे यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे असे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. महानगरातील वाढत्या सुविधा समवेत ड्रेनेज सुविधा वाढव्यात यासाठी आपण विशेष लक्ष देऊन नियोजन केले आहे. प्रत्येक भागाला पुरेसे पाणी मिळेल याकडे आपण लक्ष दिले आहे. येत्या काही दिवसात 24 तास पाणी राहील असे सांगून नाग नदी महानगराच्या सौंदर्याचा एक भाग असेल असे त्यांनी स्पष्ट केले.
यावर्षी मागील 25 वर्षातील अतिवृष्टीचा रेकॉर्ड ब्रेक झाला. यामुळे नाग नदीवर असलेले पूल मोठे करावी लागली. लवकरच ही कामे युद्धपातळीवर पूर्ण केले जातील. शहराच्या विकासाचा मार्ग चांगल्या रस्त्यातून स्वच्छतेतून, स्वच्छतेतून क्रीडांगणापर्यंत व क्रीडांगणापासून आरोग्यापर्यंत भक्कम होत जात असतो. यासाठीच प्रत्येक टप्प्यावर विशेष लक्ष आपण देत आहोत. रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांना स्वतंत्र फुड मॉल विकसीत करुन त्यांना तिथे अधिक चांगल्या सुविधा दिल्या जातील असे ते म्हणाले. दक्षिण-पश्चिम नागपूर आणि पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 552 कोटी 93 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. यावेळी सिमेंट रस्ते, ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पातील वाणिज्य आणि रहिवासी संकुल, गोरेवाडा व प्रतापनगर जलकुंभ, सार्वजनिक स्मार्ट टॉयलेट, व्हर्टिकल गार्डन, ई- बसेस, आरोग्य मंदिर, ग्लो गार्डन, अहिल्याबाई होळकर सभागृह, छत्रपती शाहू महाराज रिसर्च इन्स्टिट्यूट, पंडित दीनदयाल उपाध्याय व राष्ट्रमात कस्तुरबा ग्रंथालयांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.