
यवतमाळ (Yavatmal) : जिल्ह्यात जलजीवन मिशनचे अनेक कामे प्रगतिपथावर आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून निधी उपलब्ध करून न दिल्याने कंत्राटदारांनी ’जैसे थे स्थितीत‘जलजिवनची कामे बंदचा निर्णय घेतला आहे. निधी उपलब्ध करून देणार नाही, तो पर्यंत कामे सुरू न करण्याचा निर्णय कंत्राटदारांनी घेतला. या संदर्भात पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले असून, तातडीने निधी द्यावा, अशी मागणी केली.
जलजीवन मिशनची जिल्ह्याभरात एक हजार दोनशे योजनांची कामे चालू आहे. बरीच कामे आजघडीस पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे एप्रिल 2024 मध्ये पाणीपुरवठा विभागाने दोनशे कोटी रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविली होती. त्यानंतर केवळ 60 कोटी 44 लाख रुपये शासनाने उपलब्ध करून दिले. त्यामुळे कंत्राटदारांची देयके थकले आहे. अशा परिस्थितीत अनेक कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जलजीवनचे काम घेणाऱ्या बहुतांश कंत्राटदारांनी सवाई बट्ट्याने पैसे काढले होते. यातून दोन पैसे कमाई होईल, अशी अपेक्षा कंत्राटदारांना होती. परंतु कमाई सोडून द्या, व्याजाचे पैसे भरून अनेक कंत्राटदारांचे कंबरडे मोडले आहे. या बाबीची दखल घ्यावी आणि तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कंत्राटदारांनी पालकमंत्री संजय राठोड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सद्यःस्थितीत कंत्राटदारांनी संपूर्ण कामे बंद ठेवली आहे. निधीअभावी बंद असलेल्या कामांना प्रस्तावित दंड रद्द करून निधी उपलब्ध झाल्यावर विनादंड मुदतवाढ द्यावी, आदींची पूर्तता करावी, अशी मागणी निवेदनातून केली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष किशोर थोटे, गणेश पांढरकार, सतीश आवठे यांच्यासह इतरही कंत्राटदार उपस्थित होते.
निधीअभावी कामे ठप्प त्यामुळे कंत्राटदारांचे बेहाल आहेत. जिल्ह्यात बाराशेहून अधिक कामे चालू आहे. तर बहुतांश कामे पूर्ण झाली आहे. तरीसुद्धा पूर्ण झालेल्या कामाचे देयके अदा करण्यात आले नाही. परिणामी, कंत्राटदार बेहाल झाले असून, अनेकजण कर्जबाजारी झाले आहे. चालू असलेल्या कामातून पैसे मिळणे अवघडच, परंतु झालेल्या कर्जाची परतफेड करण्याची चिंता कंत्राटदारांना पडली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची भेट घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
- किशोर थोटे, अध्यक्ष, ग्रामीण पाणी पुरवठा कंत्राटदार संघटना