
चंद्रपूर (Chandrapur) : राज्य सरकारने बळीराजा शेत पांदण रस्त्याची योजना आणली. चंद्रपूर जिल्ह्यात चौदाही तालुक्यांत याची कामे सुरू आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यात मात्र मस्टर (ऑनलाइन मजुरांचे हजेरी पट) काढण्यात न आल्याने ही कामेच ठप्प आहेत.
विशेष म्हणजे या कामाच्या टेंडर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात निघाल्या. चार महिने लोटूनही कामाचा श्रीगणेशा झाला नाही. त्यामुळे या कामाचा निधी परत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पांदण रस्त्याची कामे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या माध्यमातून चालतात. यासाठी खनिज विकास निधी आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामातून निधी मिळतो. मातोश्री पांदण रस्ता आणि पांदण रस्ता ही योजना सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाने बळीराजा पांदण रस्ता योजनेला सुरवात केली.
पांदण रस्त्यांची जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे विविध योजनांतून ही कामे करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. मागीलवर्षी बळीराजा शेत पांदण रस्ता योजनेला मंजुरी मिळाली. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पंधराही तालुक्यांत बळीराजा शेत पांदण रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणावर मंजूर झाली.
या कामाच्या टेंडर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने काढल्या. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदारांना कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. काही कंत्राटदारांना ऑगस्ट, तर काही कंत्राटदारांना नोव्हेंबर महिन्यात काम सुरू करण्याचे आदेश मिळाले. मात्र, या कालावधीत पावसाळा होता. शेतात पिके असल्याने ही कामे सुरू करता आली नाही.
मात्र, पावसाळा संपताच ही कामे सुरू ठेवण्यात येत असल्याचे पत्र जिल्हा प्रशासनाने आयुक्तांना पाठविण्यात आले होते. पावसाळा संपताच अन्य तालुक्यांत कामाचे मस्टर काढून कामे सुरू करण्यात आली. मात्र, ब्रह्मपुरी तालुक्यातील कामे मस्टरच्या अडथळ्यात अडकून पडली आहेत. या तालुक्यात ३० ते ३२ कामे मंजूर आहेत.