
चंद्रपूर (Chandrapur) : मोहाळी येथे प्रस्तावित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मंत्रालयात धूळखात आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीअभावी इतर प्राथमिक केंद्राच्या पुनर्रचनेस खीळ बसली आहे. मोहाळी आणि त्या परिसरातील गावे नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्रास जोडण्यात आली आहेत. या गावांचे आणि नवेगाव पांडव आरोग्य केंद्राचे अंतर 15 किमीपेक्षा जास्त आहे. या अंतरामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.
या समस्या लक्षात घेऊन मोहाळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रस्तावित करण्यात आला आहे. या बाबीस आता बरीच वर्षे झाली असली तरी मंजुरीची प्रक्रिया मंत्रालय पातळीवरच थंडबस्त्यात पडून आहे. दरम्यान, जिल्हा परिषद चे माजी सदस्य संजय गजपुरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याबाबत निवेदन दिले होते. या निवेदनाचा संदर्भ देत मुनगंटीवार यांनी 23 जून 2023 रोजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पत्र लिहून मोहाळी येथील प्रस्तावित आरोग्य केंद्राला त्वरित मंजुरी देण्याचे म्हटले आहे.
चुकीचे समावेशन
कोर्धा, किरमिटी ही गावे नवेगाव पांडव प्रा.आ.केंद्राच्या अगदी शेजारी आहेत. त्यांचा समावेश 12 ते 14 किमीवरील मौशी प्रा. आ. केंद्रात करण्यात आला आहे. बोथली, बाम्हणी, कोथुळणा व कोटगाव या गावांना मौशी हे प्राथमिक आरोग्य केंद्र अतिशय सोयीचे होऊ शकते. मात्र, या गावांचा समावेश नवेगाव पांडव केंद्रात करण्यात आला आहे.
पारडी ठवरे उपकेंद्रातील गावांची हीच व्यथा
बाळापूर प्रा. आ. केंद्रात समावेशित पारडी ठवरे या उपकेंद्रातील गावांचीही हीच व्यथा आहे. पारडी ठवरे उपकेंद्रातील पारडी ठवरे, रानपरसोडी, कोसंबी गवळी ही गावे नवेगाव पांडव केंद्राला अतिशय जवळ आहेत. मात्र, ही गावे 12 किमी अंतरावरील बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडली आहेत.
पुनर्रचनेस खीळ
सामान्य माणसाच्या सोयीसाठी सरकारकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, नागभीड तालुक्यातील काही गावे प्राथमिक आरोग्य केंद्रांना ज्या प्रकारे जोडण्यात आली ते प्रकार लक्षात घेता ती प्राथमिक आरोग्य केंद्र या गावांना सोयीपेक्षा गैरसोयीचीच अधिक होत आहेत. नागभीड तालुक्यात 5 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यातील नवेगाव पांडव, बाळापूर आणि मौशी प्राथमिक आरोग्य केंद्रात गावांच्या रचनेचा घोळ अधिक आहे. ज्या पद्धतीने गावे प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट करण्यात आली आहेत ती चुकीची आहेत. परिणामी या गावातील नागरिकांसह शासकीय यंत्रणांनाही नाहक मनःस्तापास सामोरे जावे लागत आहे.