

नागपूर (Nagpur) : नागपूर शहरात सर्वत्र चौफेर विकास कामे सुरु आहेत. भौतिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक या सर्वच क्षेत्रात नागपूरची प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. शहराच्या या सर्वांगिण विकासात प्रत्येक भागाचे योगदान मोठे आहे. विकासाच्या या श्रृंखलेत यापुढे उत्तर नागपूर नेहमीच अग्रेसर राहील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर महापालिकेच्या वतीने उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील बिनाकी तलावाचे पुनर्जीवन व सहा रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण कामांचे भूमिपूजन तसेच जोशीपुरा, मेहंदीबाग आणि एसआरए उप्पलवाडी येथील आयुष्मान आरोग्य मंदिरांचे व नारी-1 जलकुंभाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, गत दहा वर्षात नागरीकांच्या समस्या सोडविण्यात आम्हाला यश आले आहे. शहरात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, उत्तम आरोग्य व्यवस्था, युवकांच्या हाताला रोजगार मिळाले आहे. शहरातील रस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले असून, खड्डे मुक्त शहराची वाटचाल सुरू आहे. याशिवाय उत्तर नागपुरातील 80 टक्के लोक सिकलसेल, थॅलेसिमियाने ग्रस्त आहेत. या आजारांवर नागपुरात उपचार व्हावा यासाठी आपण एम्समध्ये यंत्रणा तयार करीत आहोत. या माध्यमातून दिव्यांग, शोषित, पीडित, दलित, आदिवासींचे जीवन सुसह्य करण्याचा माझा प्रयत्न आहे, अशा भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकाला मुलभूत सुविधांसह विविध प्रकल्प आणि योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्याचा नागपूर महानगरपालिकेचा नेहमी प्रयत्न राहिला आहे. ही प्रयत्नांची श्रृंखला पुढेही अविरत सुरू राहणार आहे. आज उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असल्याबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आनंद व्यक्त केला. कार्यक्रमात गडकरी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मनपाच्या स्वप्ननिकेतन या संकुलातील मालकांना प्रातिनिधिक स्वरूपात पंजीबद्ध दस्ताऐवज प्रदान करण्यात आले. कांजी हाऊस चौक बिनाकी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, माजी आमदार डॉ. मिलींद माने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे डॉ. विंकी रुघवानी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.