
भंडारा (Bhandara) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 (NH 56) वरील जवाहरनगर ते भिलेवाडा बायपास महामार्गासाठी 2018 ते 2023 पर्यंत 53.69 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण शासनाच्या वतीने करण्यात आले. यासाठी बाजारभावाप्रमाणे 60 कोटी 79 लाख 94 हजार 614 रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी 47 कोटी 89 लाख 19 हजार 469 रुपयांचे वाटप करण्यात आले, तर 12 कोटी 90 लाख 75 हजार 145 रुपयांचे वाटप अद्यापही रखडले आहे. उर्वरित निधी वाटप केव्हा होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
शासन निर्णयानुसार भिलेवाडा ते जवाहरनगर बायपास मार्गासाठी 2018 ते 2023 या कालावधीत 16 गावांतील शेतजमीन व अन्य खाजगी जमिनीचे भूसंपादन केले गेले. सदर भूसंपादन प्रक्रिया भंडारा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आली.
बायपास महामार्गासाठी 53.69 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. शेतकरी व संबंधित भूमी मालकांना रेडी रेकनरप्रमाणे 60 कोटी 79 लाख 94 हजार 614 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यापैकी 47 कोटी 89 लाख 19 हजार 469 रुपयांचे वाटप प्रशासनाच्या वतीने करण्यात आले; परंतु अद्यापही 12 कोटी 90 लाख 75 हजार 145 रुपयांचे वाटप झालेले नाही.
मागील पाच वर्षांत राष्ट्रीय महामार्गावरील शेतीचे व अन्य जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने सहानुभूतीपूर्वक मोबदल्यात वाढ करावी. शिवाय भूमिहीन झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला मिळाल्यास आर्थिक लाभ होईल व त्यांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा होईल.
ओलितास मिळालाविामनसेवा 21 लाखांचा भाव
भिलेवाडा ते जवाहरनगर बायपास मार्गासाठी भिलेवाडा येथे ओलित क्षेत्रास 21 लाख 20 हजार 50 रुपयांचा भाव दिला गेला. कोरडवाहू क्षेत्रासाठी 14 लाख 13 हजार 367 रुपयांचा भाव देण्यात आला. अन्य भागातील शेतजमिनीसहीत ओलीत व कोरडवाहू या वर्गवारीनुसार शेत- जमिनीचा भाव देण्यात आला.
या महामार्गासाठी 2.32 हेक्टरचे अधिग्रहण
नव्याने प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 247 वरील दवडीपार ते कोसरा या महामार्गाच्या बांधकामासाठी 2.32 हेक्टर क्षेत्र अधिग्रहण करण्यात आले. यासाठी 4 कोटी 9 लाख 90 हजार 326 रुपयांची रक्कम प्रस्तावित करण्यात आली आहे. महामार्गाच्या बांधकामामुळे नागरिकांच्या सुविधा वाढणार आहेत. भंडारा शहरातील अपघात व वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.