Bhandara : गरज 272 कोटींची, मिळाले फक्त 65 कोटी; 'जलजीवन'च्या 402 कामांचे काय होणार?
भंडारा (Bhandara) : जलजीवन मिशन योजनेंतर्गत प्रत्येक घराला पिण्यायोग्य नळाचे पाणी पुरविण्याचा मानस आहे. जिल्ह्यात 692 योजनांसाठी 272 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत 290 योजना पूर्ण झाल्या आहे. 65 कोटींचा खर्च झाला, उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. योजना पूर्णत्वानंतर देखभाल व दुरुस्तीवरील खर्च लहान ग्रामपंचायतींना पेलवणार काय, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
हर घर जल या संकल्पनेसह, केंद्र सरकारने देशात 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळ कनेक्शनद्वारे पुरेसे आणि सुरक्षित पाणी पुरविण्यासाठी जलजीवन मिशन सुरू केले. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या कक्षाच्या वतीने 692 पाणीपुरवठा योजनांना दीड वर्षापूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात फेब्रुवारीपर्यंत 290 योजना पूर्ण झाल्या आहेत.
प्रत्येक घरात स्वतंत्र नळ कनेक्शनची जोडणी करण्यात आली आहे. या अंतर्गत पाणी टाकी, विहिर, पाइपलाइन, वितरण जाळे, नळ कनेक्शन जोडणी व अन्य कामांचा समावेश आहे. योजनांच्या कार्यान्वयाला सुरूवात झाली आहे. परंतु, प्रतिव्यक्ती 55 लीटर पाणी मिळते का, योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळतो का, हा खरा प्रश्न आहे.
रस्त्यांची डागडूजी कधी होणार?
जलजीवनच्या कामामध्ये जलवाहिनीसाठी रस्ते फोडण्यात आले. मात्र अनेक गावातील त्या रस्त्यांची डागडूजी करण्यात आली नाही. या मार्गाने आवागमन करणे अडचणीचे ठरत आहे. अशीच तक्रार खुटसावरी येथील अनिल कोल्हे, दलीराम बन्सोडे, अरुण मांढरे, सुरेश सार्वे आदीनी प्रशासनाकडे केली आहे.
2024 पर्यंत योजना पूर्ण करावयाच्या आहेत. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 692 योजनांपैकी 290 योजना पूर्ण झाल्या. 402 योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. आतापर्यंत कंत्राटदारांना 65 कोटी रुपयांचे वितरण झाले असून, उर्वरित कामासाठी 207 कोटींची गरज आहे, अशी माहिती जलजीवन मिशन भंडारा चे कार्यकारी अभियंता व्ही. एम. देशमुख यांनी दिली.