
यवतमाळ (Yavatmal) : 'हर घर जल' योजनेंतर्गत जिल्ह्यात जलजीवन मिशन सुरू करण्यात आले आहे. यातून 876 कोटी रुपये खर्चुन 1392 योजना पूर्ण केल्या जाणार आहे. आतापर्यंत तब्बल 179 कोटींचा खर्च करूनही केवळ 39 कामे पूर्ण झाली. त्यामुळे 1300 च्यावर गावे तहानलेलीच आहेत.
जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत 1 हजार 392 गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे मंजूर करण्यात आली. त्यासाठी 876 कोटी 15 लाखांचा निधी मंजूर झाला. या निधीपैकी आतापर्यंत जवळपास 179 कोटींचा खर्च झाला आहे. त्यातून 39 गावांमधील योजना पूर्णत्वास गेल्या आहेत. उर्वरित योजनांची कामे सुरूच आहे. ही कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगितले जाते. मात्र, येत्या मार्च 2024 पर्यंत ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण करावयाची आहे. त्यासाठी आता अवघे सहा महिने उरले आहे. या सहा - महिन्यांत 1300 च्यावर गावातील - योजना कशा पूर्ण होतील, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात गेल्या अनेक दिवसांपासून कंत्राटदारांची गर्दी वाढली आहे. देयके काढण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. योजनेंतर्गत 1392 कामे सुरू असून, त्यावरील काम झालेले देयक काढले जात असल्याचे सांगितले जाते.
केवळ 300 कामे नवीन
योजनेतील एकूण 1392 पैकी 300 कामे नवीन आहेत. उर्वरित 1 हजार 92 कामे जुनीच आहेत. जुन्या पाणीपुरवठा योजनेला जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. प्राप्त निधीतून त्या नवीन आराखड्यानुसार केल्या जात आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत योजना खरंच पूर्ण होतील का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
कामांतील दर्जा झाला उघड
या योजनेतील कामांचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचा आरोप संबंधित गावातील नागरिक वारंवार करीत आहे. त्याचा प्रत्यय महागाव तालुक्यात आला आहे. तेथे स्लॅब कोसळून मजूर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेमुळे कामातील सुमारपणा उघड झाला आहे. आतापर्यंत कंत्राटदारांची देयके बिनबोभाटपणे निघत होती. दरम्यानच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. मैनाक घोष रुजू झाले. त्यांनी या योजनांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. पूर्वी कंत्राटदार व यंत्रणेतील काहींचे अर्थपूर्ण संबंध असल्याने देयके निघण्यात अडसर नव्हता. मात्र, डॉ. घोष यांनी लक्ष देण्यास सुरूवात करताच कंत्राटदारांची गोची झाली आहे.