नागपूर (Nagpur) : कोराडी वीजनिर्मिती केंद्रात काम करणाऱ्या कंत्राटदारांना (Contractor) कामाच्या मोबदल्यात सुरक्षा म्हणून जमा कराव्या लागणार या विविध राशींपैकी बँक गॅरंटीसुद्धा द्यावी लागते. बहुतेक कंत्राटदारांकडून तीन लाखांपर्यंतची बँक गॅरंटी महानिर्मितीकडे (Mahagenco) अनेक वर्षांपासून जमा आहे. त्यावर कुठल्याही प्रकारचे व्याज महानिर्मितीकडून दिले जात नाही.
अलीकडच्या काळात या बँक गॅरंटीत कंत्राटदाराच्या देयकानुसार वाढ करण्याचा निर्णय महानिर्मितीने घेतला असून हा निर्णय कंत्राटदारांवर अन्याय करणारा आहे, म्हणून महानिर्मितीने कंत्राटदाराकडून वाढीव गॅरंटी घेऊ नये, अशी मागणी महाजनको कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कोराडीच्या वतीने मुख्य अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
महाजनको कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कोराडीचे अध्यक्ष राजेश रंगारी यांनी दिलेल्या माहितीनुसार कंत्राटदारांकडून वीज केंद्राकडे विविध प्रकारच्या सुरक्षा राशी जमा असतात. त्यातच बँक गॅरंटीत वाढ करण्याचे सुचविण्यात आल्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या कंत्राटदार पुन्हा आर्थिक अडचणीत येईल.
बहुतेक कंत्राटदारांचे वीजनिर्मिती केंद्राकडे असलेले बिल तीन ते चार महिन्यांपासून थकीत आहे. बिल थकीत असले तरी कामगारांच्या वेतन व इतर आवश्यक खर्च हा कंत्राटदाराला करावाच लागतो. त्यातही बँक गॅरंटीत वाढ करण्याचे सुचविण्यात आर्थिक अडचण निर्माण होईल, म्हणून वीज केंद्राने हा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सचिव किशोर बरडे, कार्याध्यक्ष कुणाल भोसकर, उपाध्यक्ष मनोज सावजी, जयेंद्र बरडे, राजू गभने, स्वप्निल सव्वालाखे, अरुण तोष्णीवाल, देवेंद्र बुलाखे, सौरव पुखाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते.