
यवतमाळ (Yavatmal) : आर्णी येथील पोलिस ठाण्यासाठी 14 डिसेंबर 2022 च्या सरकारी आदेशानुसार 58 आर जमिनीची मंजुरी देण्यात आली होती. मात्र, स्थानिक संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चुकीचे व बनावट दस्तावेज तयार करुन 58 आर मंजूर जागेपैकी 43 आर जागा दिल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
मंजूर जागेपैकी 5 आर जागा इतर कामांसाठी देण्यात आली. 10 आर जागा अनधिकृत ताबा केलेल्या लोकांना वापरण्यासाठी सोडून देण्यात आली. यामध्ये स्थानिक महसूल अधिकारी, कर्मचारी व अतिक्रमण केलेले लोक यांच्यात संगनमत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद इंगळे यांची जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा महात्मा गांधी जयंतीपासून यवतमाळ येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
10 ऑगस्ट 2023 रोजी 43 आर यन जमिनीचा ताबा पोलिस स्टेशनला विलंबाने देण्यात आला. त्यात लांबी व रुंदी किती, याबाबत खुलासा नाही. सरकारच्या मान्यतेनुसार उर्वरित 15 आर जागेचा ताबा पोलिस स्टेशनला द्यावा. अन्यथा 2 ऑक्टोबरपासून यवतमाळच्या आझाद मैदानात महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण करण्याचा इशारा प्रल्हाद इंगळे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे या जागेला आता अत्यंत महत्त्व आले आहे. तिचे दरही गगनाला भिडले आहे. या प्रकारणासंबंधी आर्णी चे उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, आर्णी पोलिस ठाण्याला मिळालेल्या जागेबाबत प्रल्हाद इंगळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. ती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर चौकशी करू. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
मुख्य रस्त्यालगत असल्याने जागेला सोन्याचा भाव
पोलिस ठाण्यासाठी मंजूर झालेल्या जागेला सोन्याचा भाव आहे. ही जागा रस्त्यालगत आहे. पूर्वी त्यावर अतिक्रमण होते. तत्कालिन ठाणेदार पितांबर जाधव यांनी अतिक्रमण हटवून ही जागा ठाण्याला मिळावी म्हणून पाठपुरावा केला. परिणामी ती जागा पोलिस ठाण्याच्या नावे झाली आहे. मात्र 15 आर जागा कमी मिळाल्यामुळे त्याचा वापर नेमका कशासाठी होणार आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात पोहोचले आहे. ती 15 आर जागा पुन्हा अतिक्रमण करून दडपण्याचा तर प्रयत्न होणार नाही ना, अशी शंका वर्तविली जात आहे.