
अमरावती (Amravati) : जिल्हा वार्षिक योजनेमध्ये गतवर्षी जिल्ह्याने 100 टक्के खर्च केला आहे. त्याच पद्धतीने यंदाही सर्व यंत्रणांकडून कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्हा वार्षिक योजना 2022-23 तसेच 23-24 आणि अनुसूचित जाती उपाय योजनांमधील वार्षिक योजनेचा आढावा घेतला. यावेळी खा. डॉ. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे पाटील, आ. प्रताप अडसड, आ. राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, मनपा आयुक्त देवीदास पवार तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
आगामी आचारसंहितेपूर्वी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे -
कामे करताना सर्व यंत्रणांनी प्रस्ताव सादर करताना कामांची निकड, लोकप्रतिनीधींच्या शिफारशी, सूचना तसेच जनतेच्या मागण्यांना महत्त्व देऊन कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करुन प्रस्ताव सादर करावे. आगामी आचारसंहिता लक्षात घेता टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन निधी मार्चपूर्वी खर्ची पडेल, असे नियोजन करण्याच्या यंत्रणांना सूचना दिल्या.
मार्चअखेरपर्यंत झालेला वार्षिक योजनेचा खर्च -
जिल्हा वार्षिक योजना अर्थसंकल्पातील तरतूद 350 कोटी आहे. मार्चअखेरपर्यंत 350 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे, तर अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत तरतूद 101.20 कोटी आहे. मार्चअखेरपर्यंत 101.18 कोटी खर्च करण्यात आले आहे. याशिवाय आदिवासी उपयोजना व बाह्यक्षेत्रामध्ये तरतूद 96.55 कोटी असतांना मार्चअखेरपर्यंत 96.54 कोटी रुपये खर्च करण्यात आले.
गतवर्षीच्या कामांसाठी 276 कोटींची तरतूद :
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2023-24 या वर्षातील तरतूदीनुसार 395 कोटी रुपयांची तरतूद आहे. गतवर्षीच्या कामांचे दायित्व 38.69 कोटी आहे. प्राप्त तरतूद 276.58 कोटी आहे. मार्च 2024 अखेरीस खर्ची पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे. जिल्हा परिषद व नगरविकासकडील वितरित केलेला निधी माहे मार्च अखेर पर्यंत खर्च करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.