
अकोला (Akola) : महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच होर्डिंग, बाजार व परवाना विभागामार्फत होणाऱ्या वसुलीसाठी स्वाती इंडस्ट्रीजची नियुक्ती केल्याच्या विरोधात शिवसेनेच्या (ठाकरे गट) वतीने सोमवारपासून स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेला जयहिंद चौकात प्रारंभ केला असता, स्वाक्षरीसाठी महिलांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
मनपा प्रशासनाने शहरवासीयांकडून मालमत्ता कर वसूल करण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त केली. मागील आठ दिवसांपासून या एजन्सीने टॅक्स वसुलीला सुरुवात केली आहे. मालमत्ता कर विभागातील करवसुली लिपिकांनी चालू आर्थिक वर्ष व थकीत मालमत्ता करापैकी एकूण 207 कोटींपैकी 107 कोटी रुपये वसूल केल्यानंतरही प्रशासनाने तब्बल 8.48 टक्के दरानुसार करवसुलीसाठी खासगी एजन्सी नियुक्त केली.
यासाठी कंत्राटदाराला पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे 60 कोटी रुपये देयक अदा केले जाणार असून ही अकोलेकरांची आर्थिक फसवणूक असल्याचा आरोप करत शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मिश्र यांनी हा कंत्राट रद्द करण्याच्य मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख मंगेश काळे, शहरप्रमुख राहुल कराळे, नितीन ताकवाले, चेतन मारवाल रोशन राज, सुनिल दुर्गिया, लक्ष्म पंजाबी, शरद तुरकर, अंकुश शित्रे, नितीन मिश्रा, प्रशांत कराळे, देवश्री ठाकरे, मंजूषा शेळके सुनीता श्रीवास आदी उपस्थित होते.