

नाशिक (Nashik): नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्रामची जागा निश्चित झालेली नाही. याचा फायदा उठवत, सिंहस्थासाठी साधुग्राम उभारण्याची जागा निश्चित करण्याच्या नावाखाली त्र्यंबकेश्वर येथील विकासकांनी स्वताच्या जमिनींपर्यंत सरकारी खर्चाने रस्ते करून त्या जमिनींचे दर वाढवण्याचा घाट घातला आहे. यासाठी त्र्यंबक पालिकेचा ठराव करून एका विकासकाची जागा निश्चित केली आहे. मात्र, रहदारीच्या दृष्टीने अत्यंत अडचणीची असलेली ही जागा प्रत्यक्ष सिंहस्थ काळात उपयोगाची नसूनही त्यासाठी सरकारीदरबारी दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. यामुळे त्र्यंबकेश्वरमधील विकासकांच्या दबावाला बळी पडून अडचणीची जागा निश्चित होणार की चहुबाजूंनी रहदारीची सुविधा असलेली जागा निवडली जाणार, याबाबत उत्सुकता आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यात नाशिक महापालिकेने साधुग्रामसाठी विकास आराखड्यात आरक्षण टाकलेले आहे. मात्र, त्र्यंबकेश्वर येथे प्रत्येक सिंहस्थासाठी जागा बदलली जाते. यामुळे २०२७ च्या सिंहस्थासाठी साधुग्रामसाठी जागा निश्चित करतातना विकासकांच्या जमिनींचे महत्व वाढवण्याच्या दृष्टीने विचार करण्यात आला. त्यासाठी ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी व त्र्यंबकेश्वर गावाच्या पलिकडे असलेल्या कोलांबिका देवस्थानच्या २०० एकर जागेचा प्रस्ताव नगरपालिकेकडे देण्यात आला. त्यासाठी एका विकासकाने तसे पत्र नगरपालिकेला दिले.
नगरपालिकेने त्या पत्राच्या आधारे सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केला व कुंभमेळा प्राधिकरणला तसा प्रस्ताव सादर केला. मात्र, या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ त्र्यंबकेश्वरच्या रिंगरोडने जाण्याचाच पर्याय आहे. त्यातही हा रिंगरोड केवळ सहा मीटर रुंदीचा आहे. यामुळे एवढ्यामोठ्या प्रमाणावरील साधूंना साधुग्रामध्ये जाण्यासाठी तो पुरेसा ठरणार नसल्याने त्या जागेच्या प्रस्तावाला अद्याप कुंभमेळा प्राधिकरणने मान्यता दिली नसल्याचे समजते.
प्राधिकरणने साधुग्रामसाठी जागा ठरवताना ती जागा घाटांपासून जवळ, त्या जागेला चहुबाजूंनी रस्त्यांची जोडणी, तसेच त्या जागेच्या बाजूला होल्डिंग एरियासाठी आणखी जागा उपलब्ध असावी, असे निकष निश्चित केले आहे. त्या एकाही निकषात ही कोलांबिका देवस्थानची जागा बसत नाही. तसेच ही जागा डोंगर उतारावर असल्याने त्यातील केवळ १५० एकर जागाच प्रत्यक्षात उपयोगात येणार नसल्याने ती अपुरी ठरत आहे. मात्र, तीच जागा स्वीकारली जावी, यासाठी संबंधित विकासकांची लॉबी कार्यतर असून वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नवीन रस्त्याचाही ठराव?
कोलांबिका देवस्थानच्या त्या जागेपर्यंत जाण्यासाठी केवळ रिंगरोडचा पर्याय असून रिंगरोड केवळ सहा मीटरचा आहे. यामुळे या लॉबीने त्र्यंबकेश्वर पालिकेच्या माध्यमातून नवीन रस्ता मंजूर केला आहे. हा रस्ता ब्रह्मगिरीच्या टेकड्यांच्या पायथ्याने थेट त्या जागेपर्यंत जाईल, असा प्रस्तावित केला आहे. म्हणजे विकासकांच्या जागांचे व्यापारी महत्व वाढवण्यासाठी जागेचे सपाटीकरण करणे, त्यांच्यासाठी सरकारी खर्चातून नवीन रस्ता तयार करून घेणे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सिंहस्थासाठी केवळ ११ महिन्यांपेक्षा कमी कालावधी उरला असतानाही अद्याप त्र्यंबकेश्वर येथील साधुग्रामची जागा निश्चित होऊ शकली नाही.
मागच्या सिंहस्थाही असाच प्रकार
त्र्यंबकेश्वर येथील विकासकांच्या लॉबीने त्र्यंबकेश्वरमधील मोती तलाव ते बिल्वतीर्थ ते जव्हार रोड या रस्त्याचा सिंहस्थाशी कोणताही संबंध नसताना केवळ बिल्वतीर्थीजवळ असलेल्या जमिनीपर्यंत जाण्यासाठी सिंहस्थनिधीतून रस्ता तयार करून घेतला होता. त्यासाठी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पर्याही मार्ग, असे गोंडस नाव देण्यात आले होते. तो रस्ता त्र्यंबकेश्वर गावातील दाट वस्तीतील सातफूट रुंदीच्या गल्लीतून जात आहे.
या रस्त्याचा गेल्या बारा वर्षात सामान्य लोकांना काहीही फायदा झाला नाही, पण जव्हारमार्गाकडून विकासकांच्या जमिनींना थेट रस्ता मिळाल्याने त्या जागांचे व्यापारी महत्व वाढले. त्याच पद्धतीने कोलांबिका देवस्थानच्या बाजूला असलेल्या जागांचे महत्व वाढवण्यासाठी भाविक, साधुमहंत यांच्या सोयीसुविधांपेक्षा विकासकांच्या हिताचा विचार केला जात असल्याचे बोलले जात आहे.