Nashik DPC : पुनर्विनियोजनातील अनियमिततेबाबत राष्ट्रवादी आक्रमक

Nashik
NashikTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक जिल्हा नियोजन समितीने २०२२-२३ मधील सर्वसाधारण योजनेतील बचत निधीचे पुनर्विनियोजन करताना उपलब्ध निधीच्या दहापट कामे मंजूर केली आहेत. या अतिरिक्त दिलेल्या प्रशासकीय मान्यता रद्द करून झालेल्या अनियमिततेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्याच्या नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सौरभ विजय यांच्याकडे केली आहे.

Nashik
Exclusive: 'मलिद्या'ची हाव, सावेंचा PS तब्बल 9 महिने बनला साव?

नाशिक जिल्हा नियोजन समिती निधीतील अनियमिततेबाबत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्याच्या नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव सौरभ विजय यांची भेट घेऊन पत्र दिले. यावेळी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीपराव बनकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज आहिरे उपस्थित होते.

Nashik
Nagpur: इतवारी - नागभीड रेल्वे लाईन एका वर्षात तयार होणार का?

या शिष्टमंडळाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या बचत निधीचे पुनर्विनियोजन करताना बचत होत असलेल्या निधीच्या दहा पट कामे नियमबाह्यपणे मंजूर करून या कामांमध्ये अनियमितता झालेली आहे. नाशिक जिल्हा नियोजन समितीला २०२२-२३ साठी जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वसाधारण योजनेतून ६०० कोटी रुपये निधी मंजूर झालेला होता. त्यापैकी मार्च अखेरीस यंत्रणांकडून खर्च न होणारा निधी जिल्हा नियोजन समितीकडे वर्ग करून सर्वसाधारण जिल्हा योजनांतर्गत उपलब्ध होणाऱ्या बचतीचे पुनर्विनियोजन करण्यात येते. नियोजन विभागाच्या विविध शासन निर्णयानुसार या बचत निधीचे पुनर्विनियोजन करताना उपलब्ध निधीच्या प्रमाणातच कामांना मंजुरी देणे अभिप्रेत असते. तसेच पुनर्विनियोजन करताना जलयुक्त शिवार अभियान, स्वच्छ भारत अभियान, अंगणवाडी बांधकाम, प्राथमिक शाळांच्या वर्ग खोल्या बांधकाम, व तत्सम योजनांसाठी प्राधान्याने निधी देण्यात यावा व त्यानंतरही काही बचत शिल्लक राहील्यास अन्य योजनांचे महत्व व आवश्यकता विचारात घेऊन त्या योजनांना पुनर्विनियोजनाने वाढीव निधी उपलब्ध करून देण्याची मुभा असते. मात्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ साठी रु. १.२५ कोटी नियतव्यय असतांना १७.९५ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत. बांधकाम विभाग क्र. २ साठी  ७८ लक्ष निधी असतांना चक्क १०.४८ कोटींच्या कामांचा तर बांधकाम विभाग क्र. ३ यांनी १.१३ कोटीच्या निधीपोटी ११.३० कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ६५ लाख रुपयांचा निधी असतांना ग्रामपंचायत विभागाने ६.५७ कोटी रुपयांची जनसुविधा योजनेची कामे मंजूर केल्याचे निदर्शनास आले असल्याचे पत्रात नमूद केले आहे. 

Nashik
Mumbai : गोखले पुलाचे 80 टक्के काम पूर्ण; ऑक्टोबरपर्यंत दोन लेन...

निधीच्या दहापट कामे मंजूर करून प्रशासकीय मान्यतेच्या केवळ १० टक्केच  निधी वितरीत केल्यामुळे यामध्ये शासन निर्णयाचे उल्लंघन झालेले आहे. नियोजन विभाग शासन निर्णय २५ मार्च २०१५ अन्वये जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीची जेवढ्या रकमेची बचत होत असेल तेवढ्याच नवीन कामांना मंजुरी देणे अभिप्रेत आहे. मात्र बचत निधीच्या दहापट जास्त कामे मंजूर केल्याने नवीन वर्षातील कामांवर याचा परिणाम होणार आहे. या प्रकारामुळे सन २०२३-२४ मधील दायित्व मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने नवीन कामांना वाव राहणार नाही. अशाप्रकारे अनियमितता करून नियमबाह्यपणे अधिकची कामे मंजूर केल्यामुळे वर्षानुवर्षे दायित्व तयार होऊन नवीन कामे प्रस्तावित करता येणार नाही. त्यामुळे अतिरिक्त दिलेल्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात याव्या आणि या गैरप्रकाराची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com