Nashik : सिटीलिंक शहर बससेवा का ठरतेय पांढरा हत्ती? वर्षभरात 80 कोटींचा तोटा

citylink
citylinkTendernama

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक (City Link) या शहर बससेवेला २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. महापालिकेने नुकतेच मांडलेल्या अंदाजपत्रकात शहर बससेवेसाठी ७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, ही तरतूद कमी असल्यामुळे महानगर परिवहन महामंडळाने आणखी ८ कोटींची तरतूद करण्याची मागणी आहे. त्यात सुधारित अंदाजपत्रकात वाढीव तरतूद करण्याचे आश्वासन प्रशासक तथा महापालिका आयुक्तांनी दिले आहे. यामुळे सिटीलिंक बससेवेचा तोटा हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून महापालिका व नाशिक महानगर परिवहन महामंडळ हा तोटा कमी करण्यासाठी काय उपाययोजना करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

citylink
Nashik : बंदिस्त पूल कालव्यांचा सिन्नर पॅटर्न; 20 km पाईपलाईनसाठी 13 कोटी मंजूर

महापालिकेने जुलै २०२१ पासून नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून सिटीलिंक ही शहर बससेवा सुरू केली आहे. या शहर बससेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मात्र, असे असले तरी या सिटीलिंकला होणारा तोटा ८० कोटींच्या घरात गेला आहे. सिटीलिंक बससेवेला पहिल्या वर्षी ७० कोटींचा तोटा झाला होता. त्यानंतर अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीतच आठ ते दहा कोटींची भर पडली आहे. त्यामुळे ही बससेवा महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरत असल्याचे चित्र आहे.

नाशिक महानगर परिवहन महामंडळाची (सिटीलिंक) आढावा बैठक महामंडळाचे अध्यक्ष तथा मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. २१) झाली. दरम्यान, गलेलठ्ठ वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडून तसेच मनपा प्रशासनाकडून उत्पन्नवाढीसाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने तोटा भरून कसा निघणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सिटीलिंक चालवण्यासाठी वर्षाला १६३ कोटी रुपये खर्च येत असूनही उत्पन्न केवळ ८३ कोटी रुपये आहे.

citylink
Nashik : मंत्र्यांच्या पीएची दादागिरीच न्यारी, कार्यकारी अभियंत्याचे आदेशही कारकून झुगारी!

सिटी लिंक चालवण्यासाठी सध्या २५० बसेस ऑपरेटर करणारे दोन ठेकेदार, ५०० वाहकांचा ठेका असणारे दोन ठेकेदार, तसेच एसटी महामंडळाचे दोन अधिकारी आणि शासनाचा एक अधिकाऱ्याच्या वेतनांचा खर्च, कार्यालयीन मनुष्यबळाचा वेतन खर्च, वीजबील, शासनाचा कर अशा सर्व खर्चाची जबाबदारी सिटीलिंकची आहे. यामुळे बसचालवण्याच्या खर्चाबरोबरच या वेतनाचाही बोजाही महानगर परिवहन महामंडळावर पडतो. मात्र, सिटीलिंकच्या उत्पन्नात वाढ व्हावी याकरता महानगर परिवहन महामंडळाचे संचालक मंडळ तसेच अधिकाऱ्यांकडून कोणत्याही ठोस प्रकारची कार्यवाही होत नसल्याने तोट्याचा आकडा दरवर्षी वाढतच चालला आहे.

महानगर परिवहन महामंडळाच्या बैठकीत संचालक मंडळाने महापालिका आयुक्त यांच्याकडे सिटीलिंक बससेवेसाठी २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात ७८ कोटींची तरतूद करण्याची सूचना केली. नाशिक महापालिकेने सिटीलिंककरिता २०२४- २५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात ७० कोटींची तरतूद धरलेली आहे. यामुळे आणखी आठ कोटींची तरतूद करण्याची मागणी केली असता सुधारित अंदाजपत्रकात ही तरतूद वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com