Nashik: मुकणे धरणातील 400 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेमुळे 'गंगापूर'वरील अवलंबित्व होणार कमी

Mukane Dam
Mukane DamTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा काळातील पाण्याची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी तसेच नाशिक शहराची पुढील तीस वर्षांची पाण्याची गरज भागवण्यासाठी नाशिक महापालिकेने मुकणे धरण पाणी पुरवठा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे नाशिक शहराला वाढीव पाणी उपलब्ध होणार असून, नाशिक शहराचे एकट्या गंगापूर धरणावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. 

Mukane Dam
Nashik: गंगापूर धरणातील चर खोदण्याच्चा कामाला यंदा मुहूर्त लागणार

या प्रकल्पांतर्गत नव्याने उभारण्यात येणारे जलशुद्धीकरण केंद्र व मुख्य जलवाहिन्यांच्या कामाला वेग आला आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी नुकतीच या कामांची पाहणी करून आढावा घेतला. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर पुढील ३० वर्षांत या धरणातून नाशिक शहराची पाण्याची जवळपास ५० टक्के गरज मुकणे धरणातून भागवली जाणार आहे.

नाशिक शहराला गंगापूर, मुकणे व दारणा धरणातून पाणी पुरवठा मंजूर असली तरी मुख्य पाणीपुरवठा प्रामुख्याने गंगापूर धरणातून होत आहे. शहराची वाढ, औद्योगिक विस्तार आणि नवीन निवासी भागांमुळे पाण्याची मागणी सतत वाढत आहे. सध्या नाशिक शहराला दैनंदिन ५०० एमएलडी पाण्याची गरज असून २०२५५ पर्यंत  ८८२.८ एमएलडी पाण्याची गरज भासणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे महापालिका पर्यायी आणि मोठ्या क्षमतेचा स्रोत म्हणून मुकणे धरणाकडे बघते.

सध्या मुकणे धरणातून सुमारे १३७ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा वाढवून तो ४११ एमएलडी करण्यासाठी महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेत प्रामुख्याने धरणावर नवीन पंपिंग व्यवस्था, जॅकवेल सुधारणे, विद्युत व यांत्रिक सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच विल्होळी येथे २७४ एमएलडी क्षमतेचा पाणीशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार आहे.

Mukane Dam
नार-पार-गिरणा प्रकल्प: 4,116 कोटींचे टेंडर फायनल; मेघा इंजिनिअरिंग - आयसीसी इन्फ्राला कार्यारंभ आदेश

या पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून नव्या नाशिक भागाला पाणी पुरवले जाणार आहे. तसेच या योजनेतून गांधीनगर-साधूग्राम-निलगिरीबाग या भागांना जोडणाऱ्या मोठ्या व्यासाच्या पाइपलाइन टाकण्यात येत आहेत. यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यात तात्पुरती वाढलेल्या मागणीची पूर्तता करता येणे शक्य होणार आहे.

या प्रकल्पासाठी साधारण ४०० कोटी रुपये खर्च येणार असून नाशिक महापालिकेने त्यासाठी फेब्रुवारी २०२६ मध्ये 'ग्रीन म्युनिसिपल बॉण्ड' (हरित - रोखे) बाजारात आणून २०० कोटी रुपये निधी उभारणी केली आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या ३७१.७५ कोटी रुपयांच्या कामांचे कार्यादेश देण्यात आले असून, उर्वरित कामांची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प मार्च २०२७ पर्यंत पूर्णत्वास नेला जाणार आहे.

Mukane Dam
Nashik: नाशिक शहरातील 1100 कोटींच्या प्रकल्पांना चालना; केंद्र सरकारकडून 272 कोटी मंजूर

असा उभारणार निधी
  प्रकल्प खर्च : ४०० कोटी रुपये.
 ग्रीन बॉण्डद्वारे २०० कोटी रुपये
अर्बन चॅलेंज फंडमधून १०० कोटी रुपये
राज्य शासन देणार १०० कोटी रुपये

या प्रकल्पाचे फायदे
मुकणे पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या ४९ टक्के पाणीगळतीचे प्रमाण कमी होऊन ते २० ते २५ टक्क्यांवर आणणे शक्य होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरातील नव्याने विकसित होणाऱ्या भागांसह संपूर्ण नाशिककरांना भविष्यात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे तसेच २४ तास अखंड पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार आहे.

तसेच विल्होळी येथे अतिरिक्त २७४ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प व निलगिरी बाग येथे २ एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारल्याने या भागात समान दाबाने पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार आहे.

Tendernama
www.tendernama.com