नार-पार-गिरणा प्रकल्प: 4,116 कोटींचे टेंडर फायनल; मेघा इंजिनिअरिंग - आयसीसी इन्फ्राला कार्यारंभ आदेश

उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या ऐतिहासिक नदीजोड प्रकल्पाचे काम सुरू; नाशिक आणि जळगावमधील सव्वा लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार
उत्तर महाराष्ट्राचा दुष्काळ हटणार!
North maharashtra, nashik, River Linking ProjectTendernama
Published on

नाशिक (Nashik): उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्यासाठी संजीवनी ठरणाऱ्या नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ४,११६.१० कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश (Work Order) सरकारने जारी केले आहेत. यामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा अनेक दशकांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.

उत्तर महाराष्ट्राचा दुष्काळ हटणार!
खानदेशसाठी Good News: नार-पार-गिरणा नदीजोडच्या 4 हजार कोटींच्या टेंडरला ग्रीन सिग्नल

राज्याच्या सिंचन क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि उत्तर महाराष्ट्राचे भवितव्य बदलणाऱ्या 'नार-पार-गिरणा' नदीजोड प्रकल्पाचा प्रत्यक्ष प्रवास आता सुरू झाला आहे. अरबी समुद्रात वाहून जाणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गिरणा उपखोऱ्यात वळवण्यासाठी जलसंपदा विभागाने ४,११६ कोटी रुपयांच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे आदेश दिले आहेत. तेलंगणा येथील 'मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड' आणि नागपूरची 'आयसीसी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड' या कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमाला (JV) हे महाकाय काम मिळाले आहे.

दुष्काळी पट्ट्याला मिळणार हक्काचे पाणी
उत्तर महाराष्ट्रातील गिरणा, मोसम, बोरी आणि कान्होळी नदी खोऱ्यांचा भाग वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करत आहे. नार-पार आणि औरंगा नद्यांचे अतिरिक्त २५ टीएमसी पाणी वळवण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. ५ सप्टेंबर २०२४ रोजी या प्रकल्पाला ७,४६५.२९ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. आता कार्यारंभ आदेश मिळाल्यामुळे लवकरच या कामाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल.

उत्तर महाराष्ट्राचा दुष्काळ हटणार!
Nashik: नाशिक शहरातील 1100 कोटींच्या प्रकल्पांना चालना; केंद्र सरकारकडून 272 कोटी मंजूर

नऊ धरणांची साखळी आणि तांत्रिक आव्हाने
या प्रकल्पांतर्गत उंबरपाडा, साम्यावन, प्रतापगड, राक्षसभुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ अशा नऊ ठिकाणी धरणे उभारली जाणार आहेत. कंत्राटदार कंपन्यांवर धरण बांधकामासह सर्वेक्षण, तपासणी, पंपगृहे उभारणे आणि जलवाहिनी (Rising Main) टाकण्याची जबाबदारी असेल. गिरणा खोऱ्यात पाणी वळवण्यासाठी दुर्गम भागात जोड बोगदे (Link Tunnels) आणि डायव्हर्शन बोगदे बांधणे हे या प्रकल्पातील सर्वात मोठे तांत्रिक आव्हान असणार आहे.

दोन टप्प्यात कायापालट
हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण केला जाईल. पहिल्या टप्प्यातून १०.६४ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या तालुक्यांतील ८१,२३० एकर क्षेत्र सिंचनाखाली येईल. दुसऱ्या बाजूला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव आणि एरंडोल तालुक्यांतील ४२,५६० एकर जमिनीला याचा थेट लाभ मिळेल. शेतीसोबतच या भागातील उद्योगांनाही हक्काचे पाणी मिळणार असल्याने उत्तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळण्याची अपेक्षा आहे.

उत्तर महाराष्ट्राचा दुष्काळ हटणार!
Nashik: किकवी धरणाला 17 वर्षांनी लागणार मुहूर्त; पायाभरणीसाठी 52 हेक्टर भूसंपादन

भूसंपादन आणि पर्यावरणीय मंजुरी मिळवण्याची जबाबदारीही कंत्राटदारांवर सोपवण्यात आली असून, जीएसटी वगळून या कामाची किंमत ४,११६ कोटी १० लाख ९१ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.

Key Points Summary

  • नार-पार-गिरणा प्रकल्पासाठी ४,११६ कोटी रुपयांचे कार्यारंभ आदेश जारी.

  • मेघा इंजिनिअरिंग आणि आयसीसी इन्फ्राटेक या कंपन्यांकडे कामाची धुरा.

  • प्रकल्पामुळे नाशिक व जळगावमधील १,२३,७९० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार.

  • नार-पार नद्यांचे १०.६४ टीएमसी अतिरिक्त पाणी गिरणा खोऱ्यात वळवणार.

  • नऊ धरणे, पंपगृहे आणि बोगद्यांच्या बांधकामाला लवकरच सुरुवात.

Tendernama
www.tendernama.com