

नाशिक (Nashik): त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुप्रतीक्षित किकवी धरणामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी ७५ टक्के पाणीसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. या धरणाच्या पायाभरणीसाठी आवश्यक ५२ हेक्टरच्या भूसंपादनाला प्रशासनाने गती देण्यात आली आहे.
यामुळे लवकरच या धरणाच्या पायाभरणीला प्रारंभ होऊ शकतो. हे धरण नाशिक महापालिकेला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी मंजूर करण्यात आले असून टेंडर प्रक्रिया राबवल्यानंतर प्रकल्प न्यायालयीन कचाट्यात सापडल्याने त्याला विलंब झाला आहे. या धरणातून नाशिक शहराला २.४ टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण पूर्ण होऊन ६५ वर्षे झाल्यामुळे त्यामध्ये गाळ साठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. मेरीच्या २००२ मधील अहवालानुसार गंगापूर धरणाच्या जिवंत साठ्यामधून ४३.७४९ दलघमी (१५४५ दलघफू) साठा कमी झाला आहे. हा साठा पुनर्स्थापित करण्यासाठी या धरणाच्या उर्ध्व बाजूस किकवी नदीवर २.४ टीएमसी नवीन धरण बांधण्यासाठी २६ ऑगस्ट २००९ रोजी २८३.५४ कोटी रुपयांची शासनाने प्रशासकीय मान्यता दिली होती. आताच्या किंमतीनुसार या प्रकल्पाची किंमत आता ८०० कोटींवर पोहोचली आहे.
या प्रकल्पासाठी १७२.४ हेक्टर वनजमीन व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १० गावातील ७३४.५ हेक्टर खाजगी जमिनीची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने १७२.४ हेक्टर वनजमीन हस्तांतरण प्रस्तावास भारत सरकार पर्यावरण आणि वन विभागाकडून २०१४ मध्ये तत्वतः मान्यता मिळालेली आहे. तसेच केंद्र शासनाकडून या प्रकल्पाच्या पर्यावरण प्रस्तावासही त्यानंतर मान्यता मिळालेली आहे.
या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्यार खाजगी जमिनीच्या भूसंपादनासाठी संयुक्त मोजणी पूर्ण झालेली आहे. या प्रकल्पामुळे नाशिक शहराच्या मधून वाहत असलेल्या गोदावरी नदीचे पूरनियंत्रण, ०.५० मेगावॅट वीजनिर्मिती, आदिवासी क्षेत्रात सिंचन व पिण्याच्या पाण्याचा अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. जिल्हा प्रशासनाने दहा गावांमधील भूसंपादनासाठी दर निश्चित केले असले, तरी या गावांमधील शेतकऱ्यांचा विरोध आहे.
प्रशासन एकीकडे शेतक-यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असले तरी धरण्याच्या पायाभरणीसाठी आवश्यक क्षेत्र प्राधान्याने संपादित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसाल किकवी धरणाच्या पायाभरणीसाठी प्राधान्याने ५२ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यास प्रारंभ झाला आहे.
पहिल्या टप्प्यात तीन गटांची खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. उर्वरित क्षेत्राच्या अधिग्रहणासाठीही प्रशासनाकडून आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे किमान सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी धरणांची पायाभरणी पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या गावात होणार भूसंपादन
तळवाडे, ब्राह्मणवाडे, पिंप्री, घुमोडी, शिरसगाव, काचुर्ली, सापगाव, पिंपळद, तळेगाव, अंबोली.
किकवी धरण एक दृष्टीक्षेप
- किकवीसाठी ९०२.२०५ हेक्टर संपादन
- दहा गावांतील ८४९ गटांचे अधिग्रहण करावे लागणार
- १३१ जागामालकांची संपादनास पूर्वलेखी संमती
- किकवीमुळे नाशिक शहराची २०५५ पर्यंतची पाण्याची गरज भागणार
- किकवीमुळे गोदावरी नदीचे पूरनियंत्रण करणे शक्य