Nashik: सिंहस्थातील ३ रस्त्यांच्या गुणवत्तेवर आयआयटी मुंबईची मोहोर; महापालिकेला दहापैकी दहा गुण

खडकाळी-आयआयटी सिग्नलसह तीन रस्त्यांची पूर्वसूचना न देता पाहणी; रस्त्यांची गुणवत्ता, रचना आणि आराखड्याच्या तपासणीत १०/१० गुण
IIT Mumbai
IIT MumbaiTendernama
Published on

नाशिक (Nashik): नाशिक महापालिका हद्दीत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या २८ प्रमुख रस्त्यांपैकी तीन रस्त्यांच्या कामांची आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांनी नुकतीच पूर्वसूचना न देता पाहणी केली. रस्त्यांची गुणवत्ता, रचना आणि आराखडा या तीन बाबींच्या तपासणीत तिन्ही रस्त्यांना दहापैकी दहा गुण मिळाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. यामुळे सिंहस्थ कामांच्या गुणवत्तेवरून गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाचा आत्मविश्वास वाढला आहे.

IIT Mumbai
Nashik: महापालिकेचा दुटप्पीपणा उघड; म्हसरूळ-वरवंडी रस्त्यासाठी DSR, तर रस्ते दुरुस्तीसाठी स्टार रेट

नाशिक महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार केलेल्या आराखड्यातील आतापर्यंत सुमारे ३,७०० कोटी रुपयांच्या कामांना कुंभमेळा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यापैकी सुमारे १,४०० कोटी रुपयांच्या २८ प्रमुख रस्त्यांची कामे सध्या सुरू आहेत.

काही महिन्यांपूर्वी खडकाळी ते आयआयटी सिग्नल या रस्त्याचे व्हाइट टॉपिंग सुरू असताना रस्त्याला तडे गेले होते. त्यानंतर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी स्वतः जेसीबी मशिन बोलावून हा भाग खोदण्याचे आदेश दिले होते. सिंहस्थाच्या कामांच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी त्यावेळी दिला होता.

पावसाळ्यात युटिलिटी डक्टची अपुरी कामे, त्यासाठी केलेले खोदकाम आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महापालिका प्रशासनावर टीका झाली. या खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचे आणि काही जणांचा मृत्यू झाल्याचेही या पार्श्वभूमीवर सांगण्यात आले. त्यामुळे सिंहस्थाच्या कामांची वेळ, गुणवत्ता आणि टेंडर प्रक्रियेवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

दरम्यान, महापालिकेने ऐन पावसाळ्यात खडकाळी ते आयआयटी सिग्नल, आयटीआय सिग्नल ते पिंपळगाव बहुला आणि गरवारे फाटा ते एक्स्लो पॉइंट या तीन रस्त्यांच्या एका बाजूच्या व्हाइट टॉपिंगचे काम पूर्ण केले आहे.

IIT Mumbai
द्वारका ते नाशिकरोड 10 पदरी रस्त्याचे काय झाले? 6 महिन्यांपासून टेंडर-टेंडरचा खेळ

सिंहस्थाच्या कामांच्या गुणवत्ता तपासणीसाठी महापालिकेने तीन-चार संस्थांची नियुक्ती केली आहे. याशिवाय आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांचीही मदत घेतली जात आहे. नुकत्याच झालेल्या पाहणीत वरील तीनही रस्त्यांच्या कामांना गुणवत्ता, रचना आणि आराखडा या तिन्ही तपासणीमध्ये दहापैकी दहा गुण मिळाल्याचे महापालिकेने सांगितले.

महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सिंहस्थाच्या कामांमध्ये कोणतीही अनियमितता अथवा त्रुटी नसल्याचा ठाम दावा केला आहे. महापालिकेने आतापर्यंत काढलेल्या सर्व टेंडर प्रक्रियेची कागदपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. शंका असल्यास संबंधितांनी ही कागदपत्रे तपासावीत, असे आवाहन त्यांनी केले.

“सिंहस्थाच्या कामांमध्ये एक तरी चूक काढून दाखवा; मी माझे नाव बदलेन,” असे आव्हान आयुक्त खत्री यांनी दिले. अंदाजपत्रके, टेंडर प्रक्रिया आणि कामांची गुणवत्ता याबाबत महापालिका पूर्णपणे पारदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आयआयटी पवईच्या अभियंत्यानेही महापालिका हद्दीतील सिंहस्थाच्या विविध कामांची पाहणी केली. कामांची गुणवत्ता आणि मजबुती पाहून अशा प्रकारची मजबुती यापूर्वी कुठेही पाहिली नसल्याचे संबंधित तज्ज्ञांनी सांगितल्याचा दावा आयुक्तांनी केला. सिंहस्थाच्या कामांच्या गुणवत्ता नियंत्रणात कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

IIT Mumbai
सिंहस्थाच्या कामांना मार्च 2027ची डेडलाइन; ऑगस्टपर्यंत केवळ 27 टक्के कामे पूर्ण

Key Points

  • सिंहस्थासाठी नाशिक महापालिका हद्दीत २८ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू,

  • तीन रस्त्यांची आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून पूर्वसूचना न देता पाहणी,

  • गुणवत्ता, रचना आणि आराखड्याच्या तपासणीत तिन्ही रस्त्यांना दहापैकी दहा गुण,

  • सिंहस्थाच्या सुमारे ३,७०० कोटींच्या कामांना आतापर्यंत मंजुरी; १,४०० कोटींच्या २८ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू,

  • गुणवत्ता आणि टेंडर प्रक्रियेवर शंका असल्यास कागदपत्रे तपासण्याचे आयुक्त मनीषा खत्री यांचे आवाहन.

Tendernama
www.tendernama.com