सिंहस्थ काळात खासगी ‘टेंट सिटी’ उभारता येणार; किमान २ एकर जमीन आवश्यक

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची एसओपी निश्चित; पाणी, स्वच्छतागृहे, सांडपाणी, कचरा, वीज, वाहनतळ आणि आपत्कालीन व्यवस्थेसाठी स्वतंत्र निकष
Kumbh Mela
Kumbh MelaTendernama
Published on: 

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी अतिरिक्त निवास व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने खासगी जमिनीवर ‘टेंट सिटी’ उभारण्यास परवानगी देण्यात येणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने यासाठी सविस्तर कार्यपद्धती (SOP) निश्चित केली आहे. खासगी जमीनमालक किंवा जमीनमालकाशी नोंदणीकृत सामंजस्य करार (MOU) असलेले ऑपरेटर यासाठी अर्ज करू शकणार आहेत.

सिंहस्थ काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुमारे १२ कोटी भाविक येतील, असा अंदाज गृहित धरून प्राधिकरणाकडून नियोजन सुरू आहे. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी निवास आणि वाहनतळाची व्यवस्था करण्यासाठी खासगी व्यक्तींचा सहभाग घेण्यात येणार आहे.

टेंट सिटीमध्ये निवासासोबतच स्वच्छतागृहे, स्नानगृहे, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन, वाहनतळ, भोजन, सुरक्षा आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक राहणार आहे.

Kumbh Mela
सिंहस्थाची कामे मार्च २०२७ पूर्वी अपूर्ण राहिल्यास जबाबदारी प्रस्ताव सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर

किमान २ एकर जमीन आवश्यक

टेंट सिटीसाठी प्रस्तावित जमीन खासगी मालकीची, सलग आणि कोणत्याही बोजामुक्त स्वरूपाची असणे आवश्यक आहे. जमीन नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत आणि किमान दोन एकर क्षेत्रफळाची असावी. जमीनमालक स्वतः किंवा जमीनमालकाशी नोंदणीकृत MOU असलेला ऑपरेटर अर्ज करू शकणार आहे.

टेंट सिटीची उभारणी तात्पुरती राहणार आहे. मंजूर कालावधी संपल्यानंतर सर्व तंबू आणि संरचना हटवून जागा पूर्ववत करणे बंधनकारक राहणार आहे.

सांडपाणी नदी-नाल्यात सोडण्यास मनाई

टेंट सिटीमध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणासाठी विशेष निकष निश्चित करण्यात आले आहेत. पुरेशी स्वच्छतागृहे आणि स्नानगृहे तसेच दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

नदी, नाला किंवा नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात कोणत्याही प्रकारचे सांडपाणी सोडता येणार नाही. उघड्यावर कचरा टाकणे किंवा कचरा जाळण्यासही मनाई असेल.

पाण्याची नियमित गुणवत्ता तपासणी

पिण्याचे आणि इतर वापराचे पाणी यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. बिगर-पर्वणीच्या काळात सात दिवसांतून एकदा, तर प्रमुख पर्वणीच्या काळात दररोज पाण्याची गुणवत्ता तपासावी लागणार आहे. या तपासणीची नोंद ठेवणेही बंधनकारक असेल.

कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण करावे लागेल. अधिकृत संस्थेमार्फत दररोज कचरा संकलित करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार त्याची विल्हेवाट लावावी लागणार आहे. शक्य त्या ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट किंवा बायोमिथेनेशनद्वारे प्रक्रिया करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.

Kumbh Mela
नाशिक जिल्ह्यात चार मार्गांवर जनसुविधा केंद्रे; स्वच्छतागृहांपासून ईव्ही चार्जिंगपर्यंत सुविधा

आपत्कालीन आराखडा आणि विद्युत सुरक्षा बंधनकारक

प्रत्येक टेंट सिटीसाठी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून स्वतंत्र आपत्कालीन कृती आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यात आग, गर्दीचे व्यवस्थापन, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, स्थलांतर आणि हवामानाशी संबंधित इशाऱ्यांचा समावेश करावा लागणार आहे.

वीज व्यवस्थेसाठी सर्व वायरिंग सुरक्षित आणि संरक्षित असणे, अर्थ-लीकेज सर्किट ब्रेकर बसविणे आणि भाविकांना निवासासाठी जागा उपलब्ध करून देण्यापूर्वी विद्युत सुरक्षा तपासणी करून घेणे आवश्यक राहणार आहे.

टेंट सिटीसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच

खासगी टेंट सिटी उभारण्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अर्जासोबत प्रस्तावित जागेची माहिती, जमीनमालकीची कागदपत्रे, GPS निर्देशांक, आराखडा, तंबूंची संख्या व प्रकार, वाहनतळ, पाणी-वीज-सांडपाणी व्यवस्था, अग्निसुरक्षा उपाययोजना, ऑपरेटरचा अनुभव आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, सिंहस्थ काळातील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त आणि नियोजनबद्ध निवास व्यवस्था निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कायमस्वरूपी पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण न आणता भाविकांना सुरक्षित व सुविधायुक्त निवास मिळावा, यासाठी टेंट सिटीसाठी सुरक्षा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि आपत्कालीन तयारीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत.

Kumbh Mela
सिंहस्थ कुंभमेळ्यात खासगी व्यक्तींनाही उभारता येणार वाहनतळ

Key Points

  • सिंहस्थ काळात खासगी जमिनीवर टेंट सिटी उभारण्यास परवानगी

  • टेंट सिटीसाठी किमान २ एकर खासगी, सलग आणि बोजामुक्त जमीन आवश्यक

  • जमीन नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत असणे बंधनकारक

  • स्वच्छतागृहे, स्नानगृहे, पाणी, वीज, वाहनतळ, भोजन आणि सुरक्षा सुविधा आवश्यक

  • नदी, नाला किंवा नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात सांडपाणी सोडण्यास मनाई

  • प्रमुख पर्वणीच्या काळात दररोज पाण्याची गुणवत्ता तपासणी

  • प्रत्येक टेंट सिटीसाठी स्वतंत्र आपत्कालीन कृती आराखडा आवश्यक

  • मंजूर कालावधी संपल्यानंतर तंबू आणि संरचना हटवून जागा पूर्ववत करावी लागणार

  • खासगी टेंट सिटीसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार

Tendernama
www.tendernama.com