सिंहस्थनिमित्ताने मार्कंडेय पर्वताचा होणार कायापालट; 4.5 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी

Saptashrungi Gad
Saptashrungi GadTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी धार्मिक, ऐतिहासिक महत्व असलेल्या ठिकाणी पर्यटकांसाठी सुविधा व सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सप्तशृंगगड परिसरातील पौराणिक, धार्मिक आणि नैसर्गिक वैभवाने नटलेल्या मार्कंडेय पर्वताच्या विकासाला गती मिळणार आहे. वन विभागाच्या सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळाल्याने मार्कंडेय पर्वताचे रूपडे बदलणार असून, भाविक, पर्यटक आणि गिर्यारोहकांसाठी अधिक सुरक्षित व सुविधायुक्त वातावरण उपलब्ध होईल.

Saptashrungi Gad
Nashik: गंगापूर रोडला समांतर मार्गासाठी आता 66 कोटींचा नवा प्रस्ताव; प्राधिकरण काय निर्णय घेणार?

मार्कंडेय ऋषींच्या तपोभूमीशी संबंधित मानल्या जाणाऱ्या या पर्वताला धार्मिक महत्त्वाबरोबरच निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीनेही विशेष स्थान आहे. सप्तशृंगगड परिसरात येणारे हजारो भाविक आणि ट्रेकर्स वर्षभर या ठिकाणी भेट देतात. मात्र, खडतर चढाई, अपुऱ्या सुविधा आणि काही ठिकाणी असलेल्या धोकादायक दऱ्यांमुळे पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर वन विभागाने सर्वसमावेशक विकास आराखडा तयार केला आहे.

या आराखड्यानुसार पर्वतावरील चढाई सुरक्षित व सुलभ करण्यासाठी नव्या पायऱ्या बांधण्यात येणार आहेत. तसेच, आवश्यक ठिकाणी मजबूत रेलिंग उभारून अपघातांचा धोका कमी केला जाईल. विद्यमान मार्गांची दुरुस्ती करून पर्यटकांसाठी सुसज्ज दांडी रस्ता विकसित करण्यात येणार आहे. खोल दऱ्यांच्या कडेला चेन फेन्सिंग आणि संरक्षक भिंती उभारण्याचाही आराखडा तयार करण्यात आला आहे.

Saptashrungi Gad
Nashik Ring Road: नाशिकचा 7,600 कोटींचा रिंगरोड सिंहस्थापूर्वी पूर्ण होणे अशक्य? काय आहेत कारणे?

वनविभागाने या आराखड्यात विकासकामांबरोबरच पर्यावरण संरक्षणाचा समतोल राखण्यावरही विशेष भर दिला आहे. परिसरातील नैसर्गिक पाणवठ्यांची स्वच्छता, दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन करण्यात येणार असून, त्यामुळे वन्यजीवांसाठी वर्षभर पाण्याची उपलब्धता वाढेल. डोंगर उतारावरील पावसाचे पाणी अडविण्यासाठी आणि भूजल फेरभरणाला चालना देण्यासाठी गॅबियन वन बंधारे उभारण्यात येणार आहेत.

भाविक आणि पर्यटकांच्या सोयीसाठी पर्वतावर पाच सुसज्ज निवारा शेड उभारण्यात येणार आहेत. तसेच, परिसरातील निसर्गसौंदर्य अनुभवता यावे, यासाठी निवडक ठिकाणी आकर्षक पॅगोडा आणि निरीक्षण मनोरे उभारण्याचे नियोजन करण्यात आले. या सुविधांमुळे मार्कंडेय पर्वताचा पर्यटन नकाशावरील दर्जा अधिक उंचावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Saptashrungi Gad
Trimbakeshwar Tourism: सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी बदलणार ब्रह्मगिरीचा चेहरा; काय आहे ॲक्शन प्लॅन?

मार्कंडेय पर्वतावरील प्रस्तावित विकासकामांसाठीची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. आगामी कुंभमेळ्यात लाखो भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त पर्यटनस्थळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

रोजगाराच्या नव्या संधी
मार्कंडेय पर्वत परिसरात पर्यटन सुविधा विकसित झाल्यावर पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे. परिणामी, स्थानिक युवकांना गाइड, वाहतूक, खाद्यपदार्थ, निवास व्यवस्था तसेच पर्यटनाशी निगडित इतर व्यवसायांत रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

Tendernama
www.tendernama.com