

नाशिक (Nashik): महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूनी जवळपास दहा ठिकाणी ट्रक टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रक टर्मिनसमुळे समृद्धीच्या बाजूला अवैध पद्धतीने ट्रक उभे केल्याने होणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहे.
या ट्रक टर्मिनलसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जागा उपलब्ध करून देणार असून विकासकाने तेथे ट्रक टर्मिनस उभारायचे आहे. याठिकाणी वाहने उभी करण्याची सुविधा, विश्रांती, वाहने देखभाल दुरुस्ती आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर प्रवाशी व वाहनचालक यांच्या सुरक्षेसाठी १६ ठिकाणी (वे साईड अमिनीटीज) सुविधा उभारल्या जात आहेत. त्यात प्रामुख्याने ठराविक अंतरावर वाहने थांबवून फूडकोर्ट, स्वच्छता गृह,वाहनतळ उवलब्ध करून दिले जाणार आहेत.
यामुळे वाहन चालकांना सतत एका वेगाने व सरळ रेषेत वाहन चालवण्यातून होणारे संमोहन दूर होण्यास मदत होईल. मात्र, त्या ठिकाणी केवळ लहान वाहनांची सोय होऊ शकणार असल्याने समृद्धीच्या दोन्ही बाजूनी साधारण दहा ठिकाणी ट्रक टर्मिनस उभारून अवजड वाहने व चालकांना सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने हे ट्रक टर्मिनस उभारण्यासाठी इच्छुकांकडून देकार मागावण्यासाठी टेंडर प्रसिद्ध केले आहे. त्यात रस्ते विकास महामंडळ जागा उपलब्ध करून देणार असून तेथे विकासकांनी ट्रक टर्मिनसमध्ये सुविधा उभारायच्या आहेत. त्यात प्रामुख्याने वाहनतळ, वाहनांच्या सुरक्षिततेसाठी प्रवेशद्वारावर क्यूआर आधारित प्रणाली, चालकांसाठी विश्रांतीगृह, कॅन्टीन, वाहने दुरुस्ती केंद्र आदी सुविधा उभारल्या जाणार आहेत. यासाठी एकूण नऊ ठिकाणी १७४ कोटी रुपयांच्या निधीतून हे ट्रक टर्मिनस उभारायचे आहेत.
या ट्रक टर्मिनसमध्ये विकासकांना हे टर्मिनस ठराविक वर्षांसाठी भाडे तत्वाने चालवण्यास दिले जाणार असून त्यात वाहनतळाचा वापर केल्याच्या बदल्यात मिळणारा महसूल हा विकासक व रस्ते विकास महामंडळ प्रत्येकी ५० टक्के या प्रमाणे विभागून घेणार आहेत.
या प्रत्येक ट्रक टर्मिनससाठीन साधारण सरासरी ५ हेक्टर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी ट्रक टर्मिनस वर वाहने उभी करण्यासाठी वाहनांच्या प्रकारानुसार शुल्क निश्चित केले जाणार असून त्यात दरवर्षी दहा टक्के वाढ केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या ठिकाणी होणार ट्रक टर्मिनस
मुंबईकडून सुरू होणाऱ्या मार्गावर शिवणी, वरझडी, मऱ्हळ व शेलवली या चार ठिकाणी ट्रक टर्मिनस उभारले जातील
नागपूरहून सुरू होणाऱ्या मार्गावर रेनकापूर, शिवणी, वरझडी, मऱ्हळ व आमने या पाच ठिकाणी ट्रक टर्मिनस उभारले जातील
ट्रक टर्मिनससाठी होणारी गुंतवणूक
शेलवली : ८ कोटी रुपये
रेनकापूर : १० कोटी रुपये
आमने : २० कोटी रुपये
शिवणी (दोन्ही बाजू) : ६५ कोटी रुपये
वरझडी (दोन्ही बाजू) : ४८ कोटी रुपये
मऱ्हळ (दोन्ही बाजू) : ४० कोटी रुपये