

नाशिक (Nashik) : सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंतांच्या निवासासाठी साधुग्राम उभारण्यात येत असते. या साधुग्रामसाठी प्रत्येकवेळी जागा भाड्याने घेण्यापेक्षा त्या जागेचे कायमस्वरुपी अधिग्रहण करण्याचा मुद्दा मागील आठ-दहा वर्षांपासून चर्चेत आहे. त्यानुसार सरकारनेही भूसंपादनाची तयारी सुरू केली होती. मात्र, भूसंपादनाबाबत चर्चा सुरू असतानाच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम व इतर कारणांसाठी भाडेतत्त्वावर जमीन घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुंभमेळा प्राधिकरणाने त्यासाठी नाशिकला ७८४ व त्र्यंबकेश्वरमध्ये २२० एकर क्षेत्र निश्चित केले, त्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. नाशिक महापालिका, रेल्वे व इतर विभागांचे २२ हून अधिक प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. साधुग्रामसाठी भूसंपादन करण्यास दोन हजार कोटीपेक्षा अधिक निधी लागणार असल्याने जमीन भाडेतत्वावर घेण्याचा पर्याय अवलंबला जाणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे १३ आखाड्यांचे तीन ते चार लाख साधू-महंत हजेरी लावतील, असा अंदाज आहे. त्यानुसार या साधुंना निवासासह, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणकडून नियोजन सुरू आहे.
नाशिक येथील सिंहस्थासाठी पंचवटीतील तपोवन तसेच त्र्यंबकेश्वरला साधू-महंतांना वास्तव्याकरिता साधुग्राम उभारले जाणार आहे. मागील सिंहस्थात तपोवन येथे साधुग्राम उभारण्यासाठी शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर जमिनी घेण्यात आल्या होत्या. मात्र, या जमिनीवर साधुग्राम उभारताना तयार केलेल्या रस्त्यांमुळे जमीन खराब होऊन तेथे पुन्हा पीक घेण्यात अडचणी येतात.
त्यामुळे सरकारने या जमिनी कायमस्वरुपी अधिग्रहित कराव्यात, अशी जमीन धारकांचीही इच्छा आहे. त्यानुसार सरकारनेही घोषणा केली होती. महापालिकेकडूनही जमीन अधिग्रहण करण्याबाबत चर्चा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र आता सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने साधुग्रामसाठी जमिनी भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.
या प्रस्तावानुसार तपोवन परिसरासह नांदूर, नाशिक व आगरटाकळी भागात ७८४ एकरचे खासगी क्षेत्र दोन वर्षासाठी संपादित केले जाणार आहे. याच पद्धतीने त्र्यंबकेश्वरला २२० एकर जागेची निश्चिती करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जागेचे भाडे निश्चित करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. त्यामध्ये गटनिर्माण क्षेत्राधिकाऱ्यांकडून रेडिरेकनरनुसार जागेचे भाडे अंतिम केले जाईल. त्यानंतर पुढील टप्प्यात जागामालकांशी संवाद साधत करारनाम्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
गेल्या सिंहस्थात (२०१५) तपोवनात खासगी जागांचे दोन वर्षांसाठी संपादन करण्यात आले होते. त्या वेळी जागेचे शुल्क म्हणून एकरी सहा लाख व ती पूर्ववत करण्यासाठी एकरी साडेपाच लाख अशी ११ लाख ५० हजारांची भरपाई जागामालकांना देण्यात आली होती. त्या धर्तीवर यावेळी रेडीरेकनर दरानुसार भाडे व जमीन पूर्ववत करण्याचा खर्च निश्चित करण्यात येणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित कामे करण्यासाठी विविध विभागांकडूनही जमीन संपादनासाठीचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल होऊ लागले आहेत. सध्या २२ हून अधिक प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. त्यात रेल्वे, महापालिका, जलसंपदा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम, महावितरण अशा विविध विभागांचा समावेश आहे.
नाशिक शहराभोवती ६६ किलोमीटरचा रिंग रोड करण्यात येणार आहे, पण या प्रकल्पासाठी २६ गावांपैकी केवळ ढकांब्याचा प्रस्ताव दाखल आहे. या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी मिळणे बाकी आहे.