

नाशिक (Nashik): आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रस्ते कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यापाठोपाठ महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी अचानक तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत वडाळा शिवार येथील कामात खत्री यांना गंभीर त्रुटी आढळल्याने ठेकेदाराचे काम थांबवून त्यांनी कारवाईचे निर्देश दिले.
या दोन्ही घटना समान असल्या तरी त्यांच्या कारवाईत भिन्नता असल्याचे दिसत आहे. इगतपुरी तालुक्यातील रस्ते कामाचा दर्जा नित्कृष्ट असल्याचे आढळताच विभागीय आयुक्तांनी संबंधित कार्यकारी अभियंता यांनाही कारणे दाखवा नोटीस दिली. महापालिका आयुक्तांनी केवळ ठेकेदाराला नोटीस देण्याची औपचारिकता पूर्ण केली आहे. बांधकाम विभागाच्या आशीर्वादाशिवाय ठेकेदार नित्कृष्ट काम करूच शकत नसल्याने बांधकाम विभागा विरोधातही कारवाई करणे अपेक्षित आहे.
सिंहस्थापूर्वी पायाभूत सुविधा उभारण्याची कामे नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर व परिसरात युद्धपातळीवर सुरू आहे. नाशिक महापालिकेला रस्ते कामांसाठी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने २९ रस्त्यांसाठी १,२२८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १८ रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. या कामांचा दर्जा राखण्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या जातात.
सद्यस्थितीत सिंहस्थासाठी सुरू असलेल्या बांधकाम, पाणीपुरवठा, मलनिस्सारण विभागांच्या कामांची गुणवत्ता तपासणी सुरू केली आहे.मागील महिन्यात कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कु-हे-नांदुरवैद्य-साकुरफाटा मार्गाची पाहणी केली.
यावेळी त्यांनी रस्त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची तसेच रस्त्याच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस दिली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनीही याबाबत दक्षता घेत, रस्तेकामांची पाहणी सुरू केली आहे.
वडाळा शिवार येथील संत सावता माळीनगर, विठ्ठल मंदीर परिसरात सुरू असलेल्या रस्ता दुरुस्ती व सरफेस ड्रेसिंग कामाच्या ठिकाणी आयुक्तांनी अचानक भेट दिली. त्यांना तेथील कामात गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या कामांची पारदर्शकता, वेग आणि गुणवत्ता राखण्याबाबतचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत.
त्यानंतर बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. कुंभमेळा आयुक्त डॉ. गेडाम यांनी कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावली, त्याच पद्धतीने आयुक्तांनी कारवाई करणे अपेक्षित असताना बांधकाम विभागाने ठेकेदाराला नोटीस बजावणे म्हणजे एकप्रकारे या प्रकरणावर पडदा टाकल्यासारखे मानले जात आहे.
काय आढळल्या त्रुटी?
रस्तेकामाच्या तांत्रिक मापदंडांनुसार आरएस-१ विटूमन मिश्रण वापरणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात व्हीजी-३० बिटूमन वापरून काम केले जात असल्याचे आयुक्तांच्या तपासणीत आढळून आले. ही गंभीर बाब लक्षात येताच आयुक्तांनी कोणताही विलंब न करता काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले. तसेच चुकीच्या पद्धतीने टाकलेला रस्त्याचा थर पूर्णपणे काढून टाकून, निर्धारित आरएस ०१ मिश्रणानेच नव्याने व दर्जेदार काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश कंत्राटदार व संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
त्यानंतर संबंधित बी. पी. सांगळे कंट्रक्शन कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. रस्त्यांची व इतर कामे गुणवत्तापूर्ण करण्यासाठी बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरणे गरजेचे आहे. यामुळे विभागीय आयुक्तांप्रमाणे महापालिका आयुक्तांनीही तशी कारवाई करणे अपेक्षित आहे.