नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या ५० PM ई-बसेस गेल्या कुठे? चार्जिंग स्टेशनच नाही

२८ ऑगस्टला लोकार्पणानंतरही बसेस आडगाव डेपोत; चार्जिंग स्टेशन, चाचणी आणि परिवहन परवान्याची प्रक्रिया अद्याप बाकी
नाशिक महापालिकेच्या आडगाव बसडेपोत उभ्या असलेल्या ५० PM ई-बसेस
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतरही चार्जिंग स्टेशन आणि इतर प्रक्रिया अपूर्ण असल्याने नाशिकच्या ५० PM ई-बसेस आडगाव बसडेपोत उभ्या आहेत.Tendernama
Published on

नाशिक (Nashik): कुंभ भक्तीसंगम कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २८ ऑगस्टला नाशिक महापालिकेच्या ५० इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही या ई-बस सेवेचे कौतुक केले. मात्र, लोकार्पणाला दोन आठवडे उलटूनही नाशिक शहरातील एकाही रस्त्यावर या इलेक्ट्रिक बसेस धावताना दिसत नाहीत. या बसेस गेल्या कुठे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

नाशिक महापालिकेच्या आडगाव बसडेपोत उभ्या असलेल्या ५० PM ई-बसेस
जेएनपीएहून डबल-स्टॅक कंटेनर मालगाडीला हिरवा झेंडा; ३२६ किमी फ्रेट कॉरिडॉरचे लोकार्पण

माहिती घेतली असता, या बसेससाठी आवश्यक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन अद्याप उभारण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, चार्जिंग स्टेशन उभारण्याची जबाबदारी बस पुरवठादार कंपनीची आहे. तसेच बसेसची आवश्यक चाचणी आणि परिवहन विभागाची नोंदणी व वाहतूक परवान्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या ५० बसेस सध्या आडगाव बसडेपोमध्ये उभ्या आहेत.

१०० बसेस मिळणार, पहिल्या टप्प्यात ५०

पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत नाशिक महापालिकेला एकूण १०० बसेस मिळणार आहेत. त्यापैकी ५० इलेक्ट्रिक बसेसच्या संचालनासाठी महापालिकेने जुलैमध्ये JBM Ecolife Mobility Private Limited सोबत १० वर्षांचा करार केला आहे.

या करारानुसार बसेसची खरेदी, संचालन, देखभाल आणि व्यवस्थापनाची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. Procure-Operate-Maintain-Manage (POMM) पद्धतीने ही सेवा राबविली जाणार आहे.

या सेवेसाठी नाशिक महापालिका संबंधित ऑपरेटरला प्रति किलोमीटर ७४ रुपये अदा करणार आहे. त्यापैकी पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून प्रति किलोमीटर २४ रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे महापालिकेवरील प्रभावी संचालन खर्च सुमारे ५० रुपये प्रति किलोमीटर राहणार आहे.

नाशिक महापालिकेच्या आडगाव बसडेपोत उभ्या असलेल्या ५० PM ई-बसेस
90 मीटरची एरियल लॅडर ते 50 ई-बस; सिंहस्थासाठी नाशिक महापालिकेची हायटेक यंत्रणा

चार्जिंग स्टेशनची जबाबदारी कंपनीची

बसेस महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर त्याच काळात मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा असल्याने महापालिकेने त्यांच्या हस्ते ५० बसेसचे लोकार्पण करून घेतले. मात्र, आडगाव येथील बसडेपोमध्ये या बसेससाठी अद्याप चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलेले नाही.

महापालिकेच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चार्जिंग स्टेशनसाठी आवश्यक विद्युत पुरवठा उपलब्ध करून देण्याची महापालिकेची जबाबदारी होती. त्यानुसार तेथे विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. आता चार्जिंग स्टेशन उभारण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे.

चार्जिंग स्टेशन कधी उभारले जाणार, याची निश्चित माहिती महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

चाचणी आणि परवानाही बाकी

सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बसेस सध्या महापालिकेच्या डेपोमध्ये उभ्या आहेत. चार्जिंग केल्यानंतर त्या किती वेळ आणि किती अंतर धावतात, याची चाचणी घेणे बाकी आहे. चार्जिंग स्टेशन उभारल्यानंतर त्यांची चाचणी करूनच बसेस स्वीकारल्या जाणार आहेत.

याशिवाय या बसेसना अद्याप परिवहन विभागाचा वाहतूक परवानाही मिळालेला नाही. त्यामुळे चार्जिंग स्टेशन उभारणी, बसची चाचणी आणि वाहतूक परवाना या प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच बसेसचे लोकार्पण करण्याची घाई कशासाठी करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतरही ५० ई-बसेस रस्त्यावर धावत नसल्याने, नाशिककरांमध्ये या बससेवेच्या प्रत्यक्ष प्रारंभाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

नाशिक महापालिकेच्या आडगाव बसडेपोत उभ्या असलेल्या ५० PM ई-बसेस
नाशिकमध्ये सप्टेंबरपासून धावणार E-Bus; पहिल्या टप्प्यात 28 AC बसेस दाखल

Key Points

  • मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २८ ऑगस्टला ५० PM ई-बसेसचे लोकार्पण,

  • दोन आठवड्यांनंतरही एकही ई-बस रस्त्यावर धावत नसल्याचे चित्र,

  • आडगाव डेपोत चार्जिंग स्टेशन अद्याप उभारलेले नाही,

  • बसची चाचणी आणि परिवहन विभागाचा वाहतूक परवाना अद्याप बाकी,

  • १० वर्षांच्या POMM करारानुसार ऑपरेटरला प्रति किलोमीटर ७४ रुपये देणार.

Tendernama
www.tendernama.com