

नाशिक (Nashik): नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पांडवलेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकाचा कायापालट होणार असून येथे ‘वेस्ट टू वंडर पार्क’ या संकल्पनेवर आधारित नवा पर्यटन प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच चित्रीकरणासाठीही नवे केंद्र उपलब्ध होणार आहे.
याठिकाणी रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर 'वेस्ट टू वंडर पार्क' प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी दिल्लीतील झेडएच कंपनीमार्फत सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या वंडर पार्कची उभारणी केली जाणार आहे. सदर कंपन्याला २० वर्ष स्मारक चालविण्यास दिले जाणार आहे. त्या बदल्यात महापालिकेला दरमहा एक लाख २३ हजार रुपये नजराणा (रॉयल्टी) मिळणार आहे.
नाशिक महापालिकेने पांडव लेण्यांच्या पायथ्याशी १९९९ मध्ये २९ एकर जागेत चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाची उभारणी केली आहे. नाशिककरांना मनोरंजनाचे साधन प्राप्त झाल्याने सुरवातीच्या काळात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला, चांगले उत्पन्न मिळत गेले. मात्र, प्रकल्पाच्या एक-एक भागाचे खासगीकरण होत गेल्याने प्रकल्प तोट्यात जाऊ लागला.
महापालिकेने मागील २७ वर्षांमध्ये या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीवर बारा कोटी रुपये खर्च केल्याने हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरला आहे. एकूण खर्चाच्या तुलनेत केवळ दहा टक्के उत्पन्न प्राप्त झाले. यामुळे या प्रकल्पाची वाताहात झाल्याने महापालिकेने खासगीकरणातून फाळके स्मारक विकसित करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटी धर्तीवर फाळके स्मारकाचा विकास करण्यासाठी महापालिकेतील भाजपच्या सत्ताकाळात नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओला काम देण्यात आले होते. मात्र तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिकेचा तोटा होत असल्याचा आक्षेप घेतल्यानंतर बीओटी तत्त्वावर स्मारक विकास करण्यास प्रशासनाने नकार दिला.
त्यानंतर त्यावेळी पालकमंत्री असलेले दादा भुसे यांनी २०२३ मध्ये पर्यटन विभागाच्या माध्यमातून स्मारक विकासासाठी प्रयत्न सुरू केला होता. मात्र, तो निधी मिळालाच नाही. परिणामी स्मारकातून उत्पन्न कमी खर्च अधिक वाढला. त्यामुळे पांढरा हत्ती पोसण्यासारखी स्मारकाची परिस्थिती झाली आहे.
यामुळे महापालिकेत प्रशासक राजवट असताना या स्मारकाच्या नूतनीकरणासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यात आले. त्यातूनच हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर फाळके स्मारकाच्या जागेत 'वेस्ट टू वंडर पार्क' या थीमवर आधारित खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर फिल्म सिटी उभारली जाणार आहे.
त्यानुसार दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, शोले, बाहुबली या चित्रपटांमधील किल्ल्यांची प्रतिकृती वंडर पार्कमध्ये उभारली जाणार आहे. या निमित्ताने चित्रपट निर्मात्यांना चित्रीकरणाची देखील संधी उपलब्ध होणार आहे. टाकावू वस्तुपासून या प्रकल्पाचे उभारणी केली जाणार असल्याचे संबंधित कंपनीतर्फे सांगितले जात आहे.
स्मारक तीन महिने बंद
फाळके स्मारकात 'वेस्ट टू वंडर पार्क' प्रकल्प उभारणीचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. त्यासाठी २१ फेब्रुवारी ते १ एप्रिल या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी फाळके सामान्यांसाठी स्मारक बंद ठेवले जाणार आहे. या कालावधीत परिसरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे कळवण्यात आले आहे.