

नाशिक (Nashik): नाशिक महापालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाच्या ताफ्यात लवकरच अग्निशमन रोबोट दाखल होणार आहे. महापालिकेने एक अग्निशमन रोबोट आणि त्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहन पुरविण्याचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. बहुमजली इमारतींचे बेसमेंट, रासायनिक व पेट्रोकेमिकल प्रकल्प तसेच मानवी प्रवेश धोकादायक ठरणाऱ्या ठिकाणी आग नियंत्रणासाठी या रोबोटचा वापर करण्याचे नियोजन आहे.
कुंभमेळ्याच्या आराखड्यांतर्गत खरेदी प्रक्रिया
नाशिकमधील गगनचुंबी इमारतींवरील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने यापूर्वी फिनलॅण्डच्या कंपनीकडून ९० मीटर उंचीची अग्निशमन शिडी खरेदी करण्यासाठी कार्यारंभ आदेश दिले होते. मात्र, संबंधित कंपनीकडून पुरवठा झाला नाही.
यानंतर महापालिकेने फ्रान्सच्या कंपनीकडून रिमोटवर चालणारा अग्निशमन रोबोट खरेदी करण्याची चाचपणी सुरू केली. २०२३ मध्ये फ्रान्समधील एका कंपनीने बॅटरीवर चालणाऱ्या फायर रोबोटचे प्रात्यक्षिक महापालिका मुख्यालयात आयोजित केले होते.
औद्योगिक वसाहतींमधील रसायन कंपन्या, तळघरांतील आगी, गॅसगळतीमुळे लागणाऱ्या आगी आणि इलेक्ट्रिक वाहनांना लागणाऱ्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा रोबोट उपयुक्त ठरेल, असे त्यावेळी महापालिकेकडून सांगण्यात आले होते.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या आराखड्याला नगरविकास विभागाने मंजुरी दिल्यानंतर त्यातील वस्तूंच्या खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. फ्रान्समधील कंपनीने केलेल्या प्रात्यक्षिकानुसारच टेंडरमध्ये रोबोटची वैशिष्ट्ये निश्चित करण्यात आल्याचे विशेष आहे.
८०० अंश सेल्सिअस तापमानात काम करण्याची क्षमता
टेंडरमधील तांत्रिक अटींनुसार, रोबोटमध्ये ट्रॅक, वॉटर मॉनिटर, थर्मल इमेजिंग कॅमेरा, ड्राइव्ह सिस्टिम, रिमोट कंट्रोल आणि वायरलेस ट्रान्समीटर असणे आवश्यक आहे. रोबोटची उंची, रुंदी आणि लांबी अनुक्रमे सुमारे १३०, ८० आणि १३० सेंटीमीटरच्या मर्यादेत असावी. त्यामुळे तो जिने आणि दरवाज्यांमधून जाऊ शकेल.
रोबोटला IP67 दर्जाचे वॉटरप्रूफ संरक्षण आणि लिथियम-आयन रिचार्जेबल बॅटरी असणे बंधनकारक आहे. उणे ५० ते ८०० अंश सेल्सिअस तापमानाच्या वातावरणात काम करण्याची क्षमता तसेच किमान ३६० अंशांचा ऑन-द-स्पॉट टर्निंग रेडियस अपेक्षित आहे.
२५० किलो वजन वाहून नेणार, पाच टन ओढणार
रोबोटच्या चेसिससाठी उच्च ताण सहन करणारे आणि गंजरोधक एव्हिएशन ग्रेड ॲल्युमिनियम वापरण्याची अट आहे. चिखल, गवत, खड्डे, उतार आणि असमतल रस्त्यांवर चालण्याची क्षमता त्यात असावी.
रोबोटला २५० किलोपर्यंत वजन वाहून नेणे आणि पाच टनांपर्यंत वजन ओढणे शक्य असावे. तसेच ४० अंशांपर्यंतचा चढ किंवा उतार पार करणे, किमान ३० सेंटीमीटर उंचीचा अडथळा ओलांडणे आणि सामान्य रस्त्यावर ताशी किमान पाच किलोमीटर वेगाने चालणे अपेक्षित आहे.
याशिवाय HD आणि थर्मल इमेजिंग कॅमेरे, वॉटर मॉनिटर, रबर ट्रॅक, वॉटर कर्टन सेल्फ-प्रोटेक्शन यंत्रणा आणि किमान पाच टन क्षमतेची पुलिंग सिस्टिम असणे आवश्यक आहे.
पात्र पुरवठादाराला अग्निशमन कर्मचाऱ्यांना रोबोटचे संचालन, हाताळणी आणि देखभालीचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. तसेच सुटे भाग आणि विक्रीनंतरची सेवा किमान दहा वर्षे उपलब्ध करून देण्याची हमी द्यावी लागणार आहे.
Key Points
नाशिक महापालिकेकडून अग्निशमन रोबोट आणि स्वतंत्र वाहतुकीच्या वाहनासाठी टेंडर
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अग्निशमन आराखड्यांतर्गत खरेदी प्रक्रिया सुरू
उणे ५० ते ८०० अंश सेल्सिअस तापमानात काम करण्याची क्षमता
२५० किलो वजन वाहून नेण्याची आणि पाच टनांपर्यंत ओढण्याची क्षमता
बेसमेंट, रासायनिक प्रकल्प, गॅसगळती आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या आगींवर नियंत्रणासाठी वापराचे नियोजन
रोबोटचे सुटे भाग आणि विक्रीनंतरची सेवा किमान दहा वर्षे उपलब्ध ठेवण्याची अट