

नाशिक (Nashik): शहरात भूमिगत गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (MNGL) सुरू असलेल्या रस्ते खोदकामाला महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी तूर्तास ब्रेक लावला आहे. MNGLने आणखी १०३ किलोमीटर रस्ते खोदण्याची परवानगी मागितली होती. मात्र, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना वाहतूक आणि खड्ड्यांचा त्रास होऊ नये, यासाठी ही परवानगी नाकारण्यात आली आहे. गणेशोत्सवापर्यंत नवीन खोदकाम करू नये, असे निर्देशही आयुक्तांनी कंपनीला दिले आहेत.
नाशिक शहरात २०१८ पासून MNGLकडून भूमिगत गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. महापालिका हद्दीत सुमारे ७४० किलोमीटर पाइपलाइन टाकण्यास मंजुरी असून, त्यापैकी सुमारे ६४० किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. सुमारे १०० किलोमीटरचे काम अद्याप बाकी आहे. आतापर्यंत सुमारे ४७ हजार घरांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत.
दरम्यान, शहरातील आणखी सुमारे दोन लाख घरांना PNG कनेक्शन देण्याचे MNGLचे नियोजन आहे. त्यासाठी कंपनीने महापालिकेकडे १०३ किलोमीटर रस्ते खोदण्याची परवानगी मागितली होती. यामध्ये विविध रस्त्यांच्या क्रॉसिंगसाठी सुमारे तीन किलोमीटर खोदकाम करून मोठ्या संख्येने कनेक्शन देण्याचे नियोजन आहे. मात्र, सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. त्यातच पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांकडून महापालिकेवर टीका होत आहे. त्यामुळे नवीन खोदकामाला परवानगी देणे प्रशासनाने टाळले आहे.
GIS Mappingची अट
MNGLकडून यापुढे रस्ते खोदण्याची परवानगी घेण्यापूर्वी शहरातील भूमिगत गॅस पाइपलाइनचे GIS Mapping महापालिकेला सादर करावे लागणार आहे. कोणत्या रस्त्यावर पाइपलाइन टाकण्यात आली आहे, कोणत्या ठिकाणी काम बाकी आहे आणि भविष्यात कोणत्या भागात खोदकाम प्रस्तावित आहे, याची स्पष्ट माहिती उपलब्ध व्हावी, हा त्यामागील उद्देश आहे.
महापालिकेच्या बैठकीत यापूर्वीही रस्ते खोदकामामुळे होणारी दुरवस्था आणि पुनर्स्थापनेचा मुद्दा उपस्थित झाला होता. भविष्यात एकाच रस्त्यावर वारंवार खोदकाम होऊ नये, यासाठी मंजूर पाइपलाइनचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश कंपनीला देण्यात आले आहेत.
MNGLने खोदलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर ते पूर्ववत करण्याची जबाबदारी कंपनीवर आहे. मात्र, एकीकडे सिंहस्थाची कामे आणि दुसरीकडे पावसाळ्यातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता, सध्या नवीन खोदकामाला परवानगी न देण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर MNGLच्या १०३ किलोमीटर खोदकामाच्या मागणीवर महापालिका कोणता निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
Key Points
गणेशोत्सवापर्यंत MNGLच्या नवीन रस्ते खोदकामाला महापालिकेची परवानगी नाही
MNGLने आणखी १०३ किमी रस्ते खोदण्याची मागणी केली होती
नाशिकमध्ये ७४० किमी गॅस पाइपलाइन टाकण्यास मंजुरी
आतापर्यंत सुमारे ६४० किमी पाइपलाइनचे काम पूर्ण
सुमारे ४७ हजार घरांना गॅस कनेक्शन देण्यात आले
आणखी दोन लाख घरांना PNG कनेक्शन देण्याचे नियोजन
सिंहस्थाच्या कामांमुळे नवीन खोदकामाला ब्रेक
पावसाळ्यातील खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय
भविष्यात परवानगीपूर्वी GIS Mapping सादर करण्याची अट
गणेशोत्सवानंतर १०३ किमी खोदकामाच्या मागणीवर निर्णय होणार