खड्डे बुजवण्यात दिरंगाई नको; पालिका आयुक्तांना 24×7 यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश

Precast आणि Geo Polymer Techno Patchने तातडीची दुरुस्ती; विसर्जन व मिरवणूक मार्गांवर विशेष लक्ष, चांगल्या काम करणाऱ्या पालिकांना पुरस्कार
potholes
potholesTendernama
Published on

मुंबई (Mumbai): गणेशोत्सवापूर्वी राज्यातील प्रमुख शहरांमधील रस्ते आणि विसर्जन मार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी सर्व महानगरपालिकांनी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पावसाळ्यात तातडीने खड्डे बुजवण्यासाठी Precast आणि Geo Polymer Techno Patchसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

potholes
Nashik: एमएनजीएलच्या मनमानीपुढे महापालिका प्रशासन हतबल झालेय का?

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक झाली. यावेळी राज्यातील प्रमुख महानगरपालिकांच्या आयुक्तांकडून रस्ते, विसर्जन मार्ग, मिरवणूक मार्ग आणि विसर्जन घाटांवरील सुविधांचा आढावा घेण्यात आला.

विसर्जन आणि मिरवणूक मार्गांना प्राधान्य

गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्यास सुरुवात करावी, असे निर्देश देण्यात आले. विशेषतः गणेश विसर्जनाचे मार्ग, मिरवणुकीचे प्रमुख मार्ग आणि विसर्जन घाटांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कोणतेही खड्डे राहणार नाहीत, यासाठी तातडीने काम करण्यास सांगण्यात आले.

शहरातील इतर रस्त्यांसाठीही अधिकाऱ्यांच्या टीम नियुक्त करून नियमित पाहणी करावी. खड्ड्यांची माहिती देण्यासाठी नागरिकांसाठी फोन नंबर जाहीर करावेत आणि अ‍ॅप्लिकेशनद्वारे प्राप्त तक्रारींचे तत्काळ निवारण करावे, असे निर्देश देण्यात आले.

potholes
Nashik Potholes: आठवडाभरात नाशिक खड्डेमुक्त करा; गिरीश महाजनांचा महापालिकेला अल्टिमेटम

24×7 यंत्रणा; आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करावी

रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी 24×7 यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. सुरू असलेल्या कामांची नियमित पाहणी करावी आणि गरज पडल्यास महापालिका आयुक्तांनी कार्यालयात न थांबता प्रत्यक्ष फिल्डवर उतरून कामांचा आढावा घ्यावा, असे शिंदे यांनी सांगितले.

बुजवण्यापूर्वी आणि दुरुस्तीनंतरचे खड्ड्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करून नागरिकांना कामाची माहिती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

PWD, MSRDC, MIDC आणि PMRDAमध्ये समन्वय

सार्वजनिक बांधकाम विभाग, MSRDC, MIDC आणि PMRDA यांसारख्या यंत्रणांनी परस्पर समन्वय साधून त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्यासाठी टीम नियुक्त करावी, असे निर्देश देण्यात आले.

या यंत्रणांच्या अखत्यारीतील रस्ते नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्यास संबंधित महापालिकेने आपल्या खर्चाने दुरुस्ती करावी आणि त्याचा खर्च संबंधित यंत्रणेकडून वसूल करावा, असेही स्पष्ट करण्यात आले.

potholes
Nashik NMC: नाशिक महापालिकेच्या टेंडरमध्ये होणार मोठा बदल; डांबरासह सिमेंट, स्टीललाही ‘स्टार रेट’चा प्रस्ताव

गणेशोत्सवात नवीन खोदकामांना परवानगी नको

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते दुरुस्तीला प्राधान्य देताना सध्या कोणत्याही यंत्रणेला नवीन खड्डे किंवा खोदकाम करण्याची परवानगी देऊ नये, असे निर्देश देण्यात आले. गणेश मिरवणुकीच्या मार्गावरील विद्युत तारांमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यासही सांगण्यात आले.

गणेशोत्सव मंडळांकडून अनावश्यक शुल्क घेऊ नये आणि परवानगी प्रक्रिया सुलभ ठेवावी, असेही निर्देश देण्यात आले.

चांगल्या काम करणाऱ्या पालिकांना पुरस्कार

खड्डेमुक्त, सुविधायुक्त आणि दुर्घटनाविरहित गणेशोत्सवासाठी चांगले व जलद काम करणाऱ्या महापालिकांना नगरविकास विभागामार्फत पहिले, दुसरे आणि तिसरे विशेष बक्षीस देण्यात येणार आहे. खराब काम करणाऱ्या महापालिका आणि अधिकाऱ्यांचीही शासनाकडून नोंद ठेवण्यात येईल. अशा महापालिकांना निधी देताना या कामगिरीची नोंद घेतली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डी. गोविंदराज, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यासह राज्यातील प्रमुख महानगरपालिकांचे आयुक्त उपस्थित होते.

potholes
Chakan Talegaon MIDC: वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्री शिंदेही सरसावले

Key Points

  • गणेशोत्सवापूर्वी प्रमुख शहरांतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश.

  • महापालिकांना कालबद्ध कार्यक्रम राबवण्याच्या सूचना.

  • Precast आणि Geo Polymer Techno Patchचा वापर.

  • विसर्जन व मिरवणूक मार्गांवर विशेष लक्ष.

  • रस्ते दुरुस्तीसाठी 24×7 यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश.

  • खड्ड्यांच्या तक्रारींसाठी फोन नंबर व अ‍ॅपद्वारे निवारण.

  • PWD, MSRDC, MIDC आणि PMRDAमध्ये समन्वय.

  • गणेशोत्सव काळात नवीन खोदकामांना परवानगी न देण्याचे निर्देश.

  • चांगल्या काम करणाऱ्या महापालिकांना पहिले, दुसरे आणि तिसरे बक्षीस.

Tendernama
www.tendernama.com