Nashik Kumbh Mela 2027: मुख्यमंत्र्यांनी केली साधुमहंतांची नाराजी दूर; आखाड्यांना 5 कोटी, आश्रमांना 15 लाखांचा निधी

Sinhast Mahakumbh
Sinhast MahakumbhTendernama
Published on

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा वर्षभरावर येऊन ठेपला असताना, सरकारी यंत्रणा पायाभूत सुविधांवर हजारो कोटी रुपये खर्च करीत असताना सिंहस्थातील मुख्य घटक असलेल्या आखाड्यांसाठी निधीची घोषणा केली जात नाही, म्हणून सर्व आखाड्यांच्या महंतांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या नाराजीची दखल घेऊन अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आखाड्यांच्या साधुमहंतांची मुंबईत बैठक घेऊन त्यांची मागणी पूर्ण केली आहे.

Sinhast Mahakumbh
Nashik Kumbh 2027: Naroshankar ते Kushavart, 16 वारसा स्थळांचे नूतनीकरण

नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे, असे प्रतिपादन करीत मुख्यमंत्र्यांनी सर्व १३ आखाड्यांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी, संस्थानांसाठी प्रत्येकी १५ लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली. तसेच आखाड्यांच्या वीज देयकाची प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्तता करण्याचीही घोषणा केली आहे.

नाशिक व त्र्यंबेकश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या सिंहस्थात १३ आखाड्यांपैकी १० आखाडे त्र्यंबकेश्वर येथे शाहीस्नान करतात, तर तीन आखाडे नाशिक येथे शाहीस्नान करतात. नाशिक येथे येणारे साधु, महंत व आखाड्यांसाठी स्वतंत्र साधुग्रामची उभारणी केली जाते. त्र्यंबकेश्वर येथे सन्याशी, उदासी, निर्मळ व ब्रह्मचारी यांच्या दहा आखाड्यांचे साधु तेथे बाराही महिने राहतात. तेथे सिंहस्थासाठी देशभरातील त्यांच्या आखाड्यांचे साधुमहंत तीन-चार महिन्यांसाठी येत असतात.

ते साधुमहंत साधुग्राममध्ये राहण्याऐवजी आखाड्यांमध्ये राहणे पसंत करतात. यामुळे त्र्यंबकेश्वरच्या साधुग्राममध्ये कोणीही साधु वास्तव्य करीत नाही. यामुळे सिंहस्थ काळात प्रशासनाकडून या आखाड्यांमध्येच साधुंसाठी आवश्यक त्या सुविधा उभारून दिल्या जातात. मागील सिंहस्थात प्रशासनाने प्रत्येक आखाड्यासाठी पाणीपुरवठा योजनेतून नळाद्वारे पाणी, चार शेड, स्वच्छता गृह आदी सुविधा दिल्या होता. यावेळीही आखाड्यांच्या साधु महंतांनी सुरुवीतीपासून दहा आखाड्यांना प्रत्येकी पाच कोटी रुपये निधी द्यावा, अशी मागणी लावून धरली होती.

Sinhast Mahakumbh
Kumbh Mela 2027: साधुग्रामचा आराखडा बदलणार, कोट्यवधींचा अपव्यय टळणार; प्राधिकरणाने काय घेतला निर्णय?

यामुळे अखेर कुंभमेळा प्राधिकरणने दहा आखाड्यांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ७.५५ कोटी रुपये मंजूर केले. त्या निधीतून यात स्वच्छतागृह, धर्मध्वज ओटा आणि अंतर्गत सिमेंटचे रस्ते व पाणीपुरवठा ही कामे नगरपालिकेतर्फे केली जात आहे. ही कामे पहिल्या टप्प्यातील असून आवश्यकतेनुसार आणखी कामे मंजूर केली जातील, असे यापूर्वीच कुंभमेळा प्राधिकरणने स्पष्ट केले होते.

मात्र, आमची मागणी ५ कोटी रुपयांची असताना आम्हाला केवळ ७०-७२ लाख रुपये निधी दिला म्हणून आखाड्यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. अखेर मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक आखाड्याला पाच कोटी रुपये निधी दिला जाईल, अशी घोषणा करीत आखाड्यांच्या महंतांची नाराजी दूर केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आखाड्यांना प्रत्येकी पाच कोटी रुपये देतानाच आखाड्यांशी संबंधीत महंतांच्या आश्रमांनाही प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या निधीतून पायाभूत सुविधा उभारण्याची घोषणा केली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये असे किमान १०० आश्रम असून तेथे या निधीतून पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत.

Sinhast Mahakumbh
Nashik Kumbh Mela 2027: त्र्यंबकेश्वर दर्शन पथ प्रकल्पासाठी 665 कोटी; अखंड दर्शनासाठी एकेरी मार्ग प्रणाली

या निर्णयातून मुख्यमंत्र्यांनी आखाडे व आश्रमातील साधुंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कुंभ मेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिह राजे भोसले आदी उपस्थित होते.

बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी साधू महंतांनी दिलेल्या सूचना स्वागतार्ह असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साधू, महंतांनी जे चांगले काम होत आहे, त्याचे कौतुक केले आहे. तसेच जे काम अधिक गतीने आणि परिणामकारक व्हायला पाहिजे, त्यासाठी सूचना केल्या आहेत. साधू महंतांच्या बैठकीतील सविस्तर चर्चेने कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी निश्चितच मदत होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Tendernama
www.tendernama.com