

मुंबई (Mumbai): कुंभमेळ्यासाठी जगभरातून येणाऱ्या साधू, महंत व भाविक यांची सेवा करीत त्यांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत सांगितले.
नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची संधी आहे. आखाड्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी, छोट्या संस्थानांसाठी प्रति संस्थान १५ लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकाची प्राधिकरणाच्या माध्यमातून अदायगी, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच बैठकीत त्र्यंबकेश्वर दर्शन पथ प्रकल्पासाठी ६६५ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली.
बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कुंभ मेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिह राजे भोसले आदी उपस्थित होते.
बैठकीमध्ये कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी साधू महंतांनी दिलेल्या सूचना स्वागतार्ह असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साधू, महंतांनी जे चांगले काम होत आहे, त्याचे कौतुक केले आहे. तसेच जे काम अधिक गतीने आणि परिणामकारक व्हायला पाहिजे, त्यासाठी सूचना केल्या आहेत. साधू महंतांच्या बैठकीतील सविस्तर चर्चेने कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी निश्चितच मदत होणार आहे. कुंभमेळ्याच्या व्यवस्थेसाठी बृहद नियोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुढील वर्षी होत असलेल्या कुंभमेळ्याचे नियोजन आणि तयारी ही केवळ याच कुंभमेळ्यासाठी नसून ती पुढील १२ वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी असणार आहे, या पद्धतीने आखलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुढील काळात व्यवस्थेला या कुंभमेळ्यासाठी उभारलेल्या कामातूनच पुढील व्यवस्था उभाराव्या लागतील, अशा पद्धतीने काम करण्यात येत आहे.
कुंभमेळा निमित्ताने नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात स्थायी स्वरूपात विकासकामे होतील, याचाच प्राधान्याने विचार होत आहे. कुंभमेळा हा भविष्यातही विस्तारणारा असल्याने त्या पद्धतीने व्यवस्थांची उभारणी करण्यात येत आहे.
त्र्यंबकेश्वर देशामध्ये अत्यंत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. गोदावरी नदी उगमाच्या पवित्र सानिध्यामध्ये हा कुंभमेळा होत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात कॉरिडॉरचे निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर सुविधा होईल.
तसेच नाशिक येथील कुंड, रामकाल पथ, मंदिर, गुफा यांचाही जीर्णोध्दार करण्यात येत आहे. संपूर्ण नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात अध्यात्म पूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कुंभमेळा निमित्ताने आरोग्य व्यवस्थेचाही बृहत आराखडा तयार करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक साधू, महंत व भाविक यांना आरोग्य विषयक कुठलीही अडचण होणार नाही, याची परिपूर्ण दक्षता घेण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आखाड्यांसाठी असलेल्या जमिनीमधील काही क्षेत्र प्रतिबंधित करण्याकरिता निश्चितच विचार करण्यात येईल. मागील कुंभमेळ्यापेक्षा यावेळेच्या आयोजनामध्ये गोदावरी नदीचे स्वच्छ स्वरूप आपणाला सर्वांना दिसणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात येत आहे.
सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड नको
त्रंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. हे आयोजन अत्यंत दिमाखदार स्वरूपात पार पडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करीत या कुंभमेळ्याच्या सुरक्षतेबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. भाविकांची सुरक्षा, सुविधा आणि आखाड्यांच्या मागण्यांबाबतही निर्देश दिले.